दोन वेगवेगळी आंदोलने : कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नागपूर : शहरात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. पक्षातील सक्रिय कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना स्थानिक नेत्यांना मात्र समन्वय साधून पक्ष एकसंघ करण्यात रस नसल्याचे दिसत आहे. सोमवारी नोटाबंदीच्या मुद्यावर आ. प्रकाश गजभिये यांनी मोर्चा काढला तर शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गजभिये व कुंटे पाटील या दोन्ही नेत्यांच्या आंदोलनात कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यकर्त्यांमध्ये जोश होता. मात्र, अनेकांना एक आंदोलन आटोपून दुसऱ्या आंदोलनातही हजेरी लावण्याची घाई झाली होती. आपल्यावर कोणताही नेता नाराज होऊ नये, याची चिंता कार्यकर्त्यांना लागली होती. दोन्ही नेत्यांनी समन्वय साधत एकत्र येत आंदोलन केले असते तर एक भव्य आंदोलन केल्याचे श्रेय राष्ट्रवादीच्या खात्यात जमा झाले असते. शिवाय आघाडी करण्यासाठी का-कू करणाऱ्या काँग्रेसलाही आपली शक्ती दाखवून वठणीवर आणता आले असते. मात्र, आपला जोर दाखविण्याचा प्रयत्नात राष्ट्रवादी कमजोर होत असल्याचे या नेत्यांच्या लक्षातच आले नाही. ही दोन्ही आंदोलने एकत्रच व्हायला हवी होती, असा सूर आंदोलनानंतर कार्यकर्त्यांही व्यक्त केला. राष्ट्रवादीने समविचारी पक्षांशी समन्वय साधण्यासाठी आपल्या नेत्यांची समिती नेमली आहे. मात्र, आपल्या पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्याची गरज असल्याचे चित्र या वेगवेगळ्या आंदोलनांनी निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव
By admin | Updated: January 11, 2017 03:09 IST