रूपा कुळकर्णी : स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे जयंती महोत्सव नागपूर : देशात कामगार चळवळ ही सध्या सर्वात दुर्लक्षित असून ती सक्षम करायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन १९३६ च्या विचारांतून प्रेरणा घेऊन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि मोलकरीण संघटनेच्या नेत्या डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे याअंतर्गत दीक्षाभूमी येथील आंबेडकर महाविद्यालयाच्या ना.ह. कुंभारे सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत त्या मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी समाजवादी विचारवंत लीलाताई चितळे होत्या. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, सदस्य व्ही.टी. चिकाटे, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, संचालिका डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात व्यासपीठावर होते. डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, कामगार वर्गामध्ये सम्यक क्रांती करण्याची ताकद आहे हे सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच जाणले. त्यांच्या कामगार चळवळीत आजच्या व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचे उपायसुद्धा सापडतात. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये देशातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांची उत्तरे होती. आज अशा कृतींची देशाला गरज आहे. बाबासाहेबांनी आपल्या हयातीत आदर्श अशी मजूर संघटना चालवून दाखविली. कामगार चळवळ आणि जाती निर्मूलन यापैकी जाती निर्मूलन हा पर्याय त्यांना जीवनकार्य म्हणून प्राधान्याने निवडावा लागला. तरी कामगार चळवळीमध्ये त्यांचे योगदान कुणापेक्षाही कमी नाही. डॉ. गौतम कांबळे, डॉ. मोहन वानखेडे यांनी संयोजन केले. डॉ. शैलेश बहादुरे यांनी संचालन तर प्रा. विकास सिडाम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)बाबासाहेबांचा लढा हा सर्वंकष क्रांतीचा लीलाताई चितळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही अजरामर सामूहिक कृती आहे. बाबासोहबांच्या समताधिष्ठित विचाराने हा देश आज उभा झाला हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण बाबासाहेबांना केवळ पुतळ्यांमध्ये अडकवून न ठेवता संविधानाप्रत समाज निर्माण करण्याची कास धरली पाहिजे अन्यथा जातीवादाचा व धर्मांधतेचा गढूळ प्रवाह सहजासहजी जाणार नाही. बाबासाहेबांचा लढा हा कार्ल मार्क्सच्या पुढच्या क्रांतीचा म्हणजेच सर्वंकष क्रांतीचा होता. तो जेवढा भोतिक होता तेवढाच तो सांस्कृतिक होता. म्हणजे समाजामध्ये माणुसकी निर्माण करणारा होता.
बाबासाहेबांच्या विचारांतूनच कामगार चळवळ सक्षम
By admin | Updated: January 30, 2016 03:16 IST