- क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था : कंत्राटी कर्मचारी आणि प्रशासनामध्ये रंगलेय युद्ध
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यंकटेशनगर, नंदनवन येथील क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थेत सध्या गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना काळात अनेक स्थायी कर्मचारी कन्टोन्मेंट झोनपासून फारकत घेत असताना, ते दिव्य पत्करणारे कंत्राटी कर्मचारी प्रशासनाच्या धोरणावर नाराज आहेत. कर्तव्यदक्ष असतानाही, नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत तर प्रशासनातर्फे असे कुठलेही पाऊल उचलले नसल्याचे म्हटले जात आहे. या दोघांच्या तुंबळ युद्धात एव्हरेस्ट ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्ट, नवी दिल्ली या कंत्राटदार कंपनीची भूमिका संशयास्पद वाटत आहे.
क्षेत्रीय आयुर्वेदिक मातृ व शिशू अनुसंधान संस्था, १९७२ पासून कार्यरत आहे. नागपुरात व्यंकटेशनगर येथे ही संस्था २००९ साली आली आणि २२ डिसेंबर २०२० रोजी या संस्थेचे नाव क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था असे झाले. या केंद्रात आयुर्वेदिक चिकित्सेवर संशोधनासोबत आयुर्वेदिक पद्धतीने उपचारही केले जाते. गेली ११-१२ वर्षे या संस्थेचे कार्य शांततेने सुरू असतानाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध अचानक पुकारलेल्या एल्गारामुळे संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तब्बल आठ-आठ वर्षांपासून संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्याने व्यवस्थापनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कंत्राट रिन्युव्ह करण्यासाठी टेबलाखालून व्यवहार करण्याचा दबाव टाकला जात असून, कोरोनाच्या अतिशय संकटकाळात कोविड योद्धा म्हणून कार्य केल्यावरही ‘कोविड योद्धा’ या मानापासून वंचित करण्यासोबतच कंत्राटी कंपनी आणि प्रशासनामध्ये लागेबांधे असल्याचा आरोप नोकरीवरून कमी झालेले कंत्राटी कर्मचारी करत आहेत.
* आम्ही आम्हाला नेमलेल्या कार्यात तज्ज्ञ झालो आहोत. अशा स्थितीत गडचिरोली, वर्धा येथील संस्थानच्या प्रकल्पात बदली करून तेथे आम्हाला येत नसलेल्या कामात जुंपले जात आहे. आमचे कौशल्य नसलेल्या कामात उणिवा शोधून नंतर हा कर्मचारी कुशल नसल्याचे कारण सांगून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. विशेष म्हणजे, आमचे कौशल्य असलेल्या कामात दुसरी नियुक्ती केली जात आहे. हा सगळा गौडबंगाल आहे. याबाबत संस्थानने जाहीर स्पष्टीकरण द्यावे.
- प्रल्हाद सोनुने, कंत्राटी कर्मचारी (पंचकर्म टेक्निशियन)
* कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढल्याचा आरोप चुकीचा आहे. या मुलांना भडकवले जात आहे. या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्त एमटीए अर्थात मल्टी टास्किंग अटेण्डण्ट अशी आहे. मार्च महिन्यापासून नागपूर केंद्रातील ओपीडी बंद असल्याने या कर्मचाऱ्यांना गडचिरोली, वर्धा येथील प्रकल्पात समाविष्ट केले जात आहे. कुणावरही अन्याय केला जात नसून, त्यांना नोकरीवर कायम ठेवण्यात आले आहे; मात्र राजकारण केले जात असून, या कर्मचाऱ्यांचे ऑर्डर आमच्या हातातच आहेत.
- डॉ. आर. गोविंद रेड्डी, प्रभारी सहायक संचालक (क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था, नागपूर)
* शासनाच्या नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती बहुआयामी असते. तिथे गरज पडेल तिथे त्यांना पाठविण्यात येते. संस्थानकडून आम्हाला तसे पत्र आल्यास कर्मचाऱ्यांना पाठवावे लागते. या कर्मचाऱ्यांनाही तशाच नियुक्तीवर गडचिरोली, वर्धा आदी प्रकल्पात समाविष्ट करून त्यांच्या नोकऱ्या संरक्षित करण्यात आल्या आहेत. कुठलाही प्रकल्प चार-सहा महिन्याच्या वर नसतो. असे असतानाही ही मुले आक्रमक झाली आहेत, हे समजण्यापलिकडचे आहे.
-रमेश पाण्डे, सुपरवायझर (एव्हरेस्ट ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्ट, नागपूर)
..............