लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या बॉसवर चाकूहल्ला केला. त्याने छातीवर घाव घातला. मात्र बॉसच्या गळ्यात असलेल्या ओळखपत्रावर चाकू लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन् बॉसचा जीव वाचला. अमलकुमार भुनेश्वर आर्या (वय ५७) असे हल्ल्यात बचावलेल्याचे नाव आहे.
दुर्गा चाैक गोरेवाडा, गिट्टीखदानमधील मेट्रो प्लाझा बिल्डिंगमध्ये आर्याचे ऑफिस आहे. तेथे आरोपी अंकुश भगत याची पत्नी काम करते. बॉस म्हणून तिचे आर्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते नेहमी बोलतात. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा अंकुशला संशय आला. त्याने त्यासंबंधाने दोघांना समजावूनही सांगितले. ते ऐकत नसल्याची भावना झाल्याने अंकुश संतापला. शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अमलकुमार त्याच्या दुचाकीने आपल्या कार्यालयात आले. ते दुचाकी स्टॅण्डवर लावत असताना अचानक अंकुश धावत आला. त्याने चाकू काढून आर्यांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. आर्यांच्या गळ्यातील आयकार्ड समोर आल्याने तो चाकू आयकार्डवर लागला अन् आर्या बचावले. ते मदतीसाठी आरडाओरड करीत असल्याचे पाहून आरोपी अंकुशने खलबत्त्याने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. बाजूची मंडळी धावल्याने आर्या बचावले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----