विजेच्या बिलावरून झाला होता वाद - अजनीत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दीड वर्षापूर्वी अजनीत झालेल्या एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा छडा अखेर लागला.
दारुड्या इसमाने त्याच्या सावत्र आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारले, असे लक्षात येताच अजनी पोलिसांनी तेजलाल ब्रिजलाल बिलोने (वय ४२) याला अटक केली. सुशीला ब्रिजलाल बिलोने (वय ५३) असे मृत महिलेचे नाव आहे.
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजाता बौद्ध विहाराजवळ सुशीलाबाई राहत होत्या. पतीचे निधन झाल्यानंतर त्या दोन सावत्र मुलांसह राहत होत्या. आरोपी तेजलाल आळशी आणि दारुडा आहे. २८ एप्रिल २०१९ ला मध्यरात्री १ वाजता मुलाच्या घरून त्या जेऊन निघाल्या. घराच्या खाली सकाळच्या वेळी त्यांचा मृतदेहच आढळला. सुशीला यांच्या मृतदेहावर जखमा होत्या. मात्र, त्यांचा नेमका मृत्यू कसा झाला, याचा निष्कर्ष त्यावेळी पोलीस काढू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण तपासात ठेवले. दरम्यान, घटनेच्या एक दिवस अगोदर आरोपी तेजलाल आणि सुशीला यांचा विजेचे बिल भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता. तू बिल भरले नाही, त्यामुळे घरचा वीज पुरवठा खंडित झाला होता, असे म्हणून सुशीला यांनी आरोपी तेजलालला सुनावले होते. त्याचा राग मनात ठेवून आरोपी तेजलालने घटनेच्या दिवशी रात्रीच्या वेळी आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून सुशीला यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांचा जीव घेतला. त्यानंतर तो साळसूदपणे वावरू लागला. मात्र, दीड वर्षाने का होईना पोलीस तपासात त्याचे पाप उघड झाले. अजनी पोलिसांनी त्याला अटक करून त्याची पाच दिवसांची कोठडी मिळवली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अजनीचे ठाणेदार प्रदीप रायन्नावार यांनी सांगितले आहे.
---