श्याम नाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : कोरोनाच्या संसर्गामुळे शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. तब्बल १८ महिन्यांपासून मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. परंतु, आता मुलासह पालकही कंटाळले असून, त्यांना शाळा हवी आहे. परंतु, अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे या शाळा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे कोरोना सुरक्षित शाळा सुरू करण्यास शासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता पालकांकडून होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार १५ जुलैपासून नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावामध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गांची दारे विद्यार्थ्यांकरिता उघडली. त्यानंतर शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भातही शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर पुढे शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलीही हालचाल झाली नाही.
४७ शाळांची वाजली घंटा
राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावामधील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नरखेड तालुक्यातील ४७ शाळा उघडल्या आहेत. परंतु, नगरपरिषद क्षेत्रातील शाळा अजूनही बंदच आहेत.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
खासगी अनुदानित शाळांना वेतनोत्तर अनुदान
मिळत नाही. कोरोनाच्या सद्य:स्थितीत शाळांमधील वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत; पण त्याकरिता निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे सॅनिटायझेशनचे पैसे देणार कोण, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे.
--
मुले घरी कंटाळली आहेत. पाल्य अभ्यास करीत नाहीत, अशी ओरड पालकांकडून होत आहे. कोरोनापासून विद्यार्थी सुरक्षित राहतील यासाठी संपूर्ण सुविधा शाळेत ठेवून वर्ग उघडले जाऊ शकतात. नियमित सॅनिटायझेशन करता येईल व एक दिवसाआड शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाईल. विद्यार्थी जास्त असतील तर दोन-तीन सत्रामध्ये शाळा भरविता येईल.
उन्मेष शेंबेकर, मुख्याध्यापक, नरखेड.
----
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १८ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. कोरोना किती दिवस राहील सांगता येत नाही. पण, कोरोना सुरक्षित शाळा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू करता येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण नियमसुद्धा पाळले जातील. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने शाळा नियमित सुरू करावी.
- हनुमंत रेवतकर
जीवनविकास विद्यालय, देवग्राम
तालुक्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
इयत्ता मुले मुली एकूण
पहिली ९२५ ८०१ १७२६
दुसरी ९७३ ८६४ १८३७
तिसरी ८९० ७९७ १६८७
चौथी ९१४ ८४६ १७६०
पाचवी १०२५ ९०५ १९३०
सहावी १०१८ ९६६ १९८४
सातवी ९८० ९१३ १८९३
आठवी १०२५ ९५४ १९७९
नववी ८६८ ८६३ १७३१
दहावी ९०० ९०६ १८०६
अकरावी ९१० ८७९ १७८९
बारावी ९३० ८०६ १७३६