द राईट प्रीस्क्रिप्शन : डॉ. मुफज्जल लाकडवाला यांच्या पुस्तकाचे गडकरींच्या हस्ते प्रकाशननागपूर : प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. मुफज्जल लाकडवाला यांच्या ‘द राईट प्रीस्क्रिप्शन’ या पुस्तकाचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी डॉ. लाकडवाला यांच्याशी चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. लाकडवाला म्हणाले, आपल्या आयुष्याचे आपण इन्चार्ज असतो. व्यायामाच्या रूपाने आपण आपल्या शरीराचा आदर राखतो. संतुलित आहार घेतला व जीवनशैलीत संतुलन राखले तर यातून आपल्याला नक्कीच उत्तम आरोग्याचे बक्षीस मिळते. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबापुढे, मुलांपुढे आदर्श ठेवला तर तुम्हाला पाहिल्याने त्यांनाही फायदा होईल. कॉडस्मध्ये आम्ही प्रत्येक रुग्णाबाबत याच तत्त्वाचं पालन करतो. कुठलीही भीती दाखवत नाही. फॅड डायट नाही. वजन कमी करण्याचा कुठलाही जादुई फॉर्म्युला नाही. निरोगी राहणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं यालाच दरदिवशी प्राधान्य असेल. ‘द राईट प्रीस्क्रिप्शन’ हे मित्रत्वाचा सल्ला देणारे पुस्तक असून आरोग्य यात्रेचा मार्ग दाखविणारा मार्गदर्शक आहे. जेव्हा तुम्ही आपला बांधा सुडौल असला पाहिजे असा विचार करता किंवा तुम्हाला सुडौल राहण्याची गरज असेल तर या पुस्तकात तुमच्यासाठी बरेच काही आहे. हे पुस्तक तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना पौष्टिक आहार घेण्यास, फिट आणि बळकट राहण्यास प्रेरित करेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भारतीय समुद्री विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर उपस्थित होते. (प्रतिनिधी)तिशीत वजन कसे कमी केले?डॉ. लाकडवाला म्हणाले, सर्वप्रथम मी माझ्या जेवणाचे निरीक्षण करू लागलो. सर्वात मोठा बदल केला तो म्हणजे दुपारच्या जेवणासाठी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा किंवा बाहेरचे अन्नपदार्थ मागविण्यापेक्षा घरी तयार केलेले अन्न डब्यात कामावर नेऊ लागलो. हळूहळू मी माझ्या आयुष्यातून साखर हद्दपार केली. नियमित व्यायाम करू लागलो. जीमला जाऊ शकलो. शक्य तिथे लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करू लागलो, असेही त्यांनी सांगितले.
संतुलन राखा, आरोग्याचे बक्षीस मिळेल
By admin | Updated: June 19, 2016 02:56 IST