सोयाबीनचे क्षेत्र घटणार : ६ लाख १५ हजार हेक्टरचे लक्ष्यांक नागपूर : मागील काही वर्षांपासून नागपूर विभागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाने चांगलाच दगा दिला आहे. सोयाबीनची उत्पादकता कमालीची घटली आहे. त्यामुळे या पिकाचे लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. २०१५-१६ मध्ये सोयाबीनचे लागवड क्षेत्र ३ लाख ६० हजार हेक्टर निश्चित करण्यात आले होते. परंतु त्यातुलनेत केवळ ३ लाख ७ हजार २०० हेक्टरवरच लागवड झाली होती. त्याचवेळी ५ लाख ७९ हजार ५४० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे कपाशीचे क्षेत्र ६ लाख १५ हजार ५०० हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर्षी महाबीजने सोयाबीनसह सर्वच बियाण्यांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. शिवाय त्याचवेळी केंद्र सरकारने बीटी बियाण्यांच्या किमती मात्र कमी केल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ८५० रुपये प्रति पाकीट (४५० ग्रॅम बीटी + १२० ग्रॅम नॉन बीटी) भावाने मिळणारे बियाणे यंदा शेतकऱ्यांना ८३० रुपये प्रति पाकीट दराने उपलब्ध होत आहे. याचाही कपाशीचे लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. त्यानुसार कृषी विभागाने अगोदरच बियाणे उत्पादक कंपन्यांकडे २६ लाख ८६ हजार ९०० पाकीट बियाण्यांची मागणी केली आहे. यात १३ हजार ५०० बीजी -१, २६ लाख ७३ हजार १५० बीजी -२ आणि २५० नॉन बीटी पाकिटांचा समावेश आहे. कपाशीच्या या लागवड क्षेत्राचा जिल्हानिहाय विचार करता, नागपूर जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्राचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ९७० हेक्टरवर लागवड झाली होती. याशिवाय वर्धा जिल्ह्यात २ लाख २७ हजार हेक्टर, चंद्रपूर १ लाख ५५ हजार हेक्टर व गडचिरोली जिल्ह्यात ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)‘नॉन बीटी’ लावण्याचे आवाहन शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे खरेदी करताना ४५० ग्रॅम बीटी बियाण्यांसोबत १२० ग्रॅमचे रेफ्युज (नॉन बीटी) बियाणे दिल्या जाते. कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतात बीटी बियाण्यांसोबत या नॉन बीटीची लागवड करणेसुद्धा आवश्यक असते. कारण नॉन बीटी कपाशीच्या पिकाचे किडीपासून संरक्षण करते. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतो. नॉन बीटी बियाण्यांची लागवड न करता ते फेकून देतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज आहे की, नॉन बीटी लावल्यामुळे त्यांचे लागवड क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटते. मात्र तो चुकीचा समज आहे. नॉन बीटीमुळे उत्पादन कमी होत नसून, उलट उत्पादन वाढीस मदत होते. त्यामुळे खरीप हंगामात सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यांसह नॉन बीटीचीसुद्धा लागवड करावी, असे आवाहन विभागीय गुण नियंत्रण अधिकारी गावंडे यांनी केले आहे.
विभागात कपाशीचे क्षेत्र वाढणार!
By admin | Updated: June 17, 2016 03:01 IST