नागपूर : राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘सीसीटीएनएस’ प्रणालीचा अनेक पोलिस ठाण्यांत योग्य उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने सीसीटीएनएस (क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम)च्या फेब्रुवारी २०२३ नुसार नागपूर ग्रामीणला पहिले स्थान मिळविता आलेले नाही. गुन्हे अन्वेषण विभागाने नुकताच अहवाल जाहीर केला असून, बीड, नांदेड प्रथम क्रमांकावर आहेत.
खुनी, दरोडेखोर, चोरटे, आदींची कुंडली ऑनलाईन ठेवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग पोलिसांकडून करण्यात येत आहे. अप्पर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडून सीसीटीएनएस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील ५३ घटकांच्या मासिक कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर त्याची क्रमवारी जाहीर केली जाते. मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार ३४२ पैकी ३३७ गुण घेऊन बीड, नांदेड प्रथम स्थानी आहेत; तर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी ३३२ पैकी ३२७ गुण प्राप्त करीत राज्यात द्वितीय स्थान पटकावले आहे. ठाणे ग्रामीण, रायगड, लातूर या जिल्ह्यांनी तृतीय स्थान पटकावले. नागपूर ग्रामीणला यंदादेखील पहिले स्थान मिळविता आलेले नाही.
काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?
केंद्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत एनसीआरबी, नवी दिल्ली यांच्याकडून सीसीटीएनएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याअंतर्गत पोलिस ठाण्यांचे सर्व कामकाज संगणकीकृत व ऑनलाईन केले जाते. तसेच दाखल गुन्ह्यांचा मुदतीत निपटारा होतो की नाही, याची माहिती अद्ययावत ठेवली जाते.
प्रत्येक गुन्हेगाराचा डेटा ऑनलाईन
या प्रणालीमध्ये अगदी पाकीट मारणाऱ्यांपासून ते दरोडेखोरापर्यंत, शिवीगाळ करणाऱ्यांपासून ते खून करणाऱ्यांपर्यंत, छेड काढणाऱ्यांपासून ते बलात्कार करणाऱ्यापर्यंतच्या सर्व गुन्हेगारांचा आहे. डेटा ऑनलाईन केला जातो. एक क्लिक करताच पोलिसांना त्यांच्या लॉगिनमधून गुन्हेगाराची कुंडलीच या प्रणालीतून मिळते.
ऑनलाईन डाटा फीडिंगमध्ये अडचणी
ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांना ऑनलाईन माहिती भरण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात वीज जाते. त्याशिवाय इंटरनेटची गती स्लो असते. देशभरातून अपलोडिंग सुरूच असल्यामुळे सर्व्हर संथपणे काम करतो. त्याचा परिणाम पोलिसांच्या कामावर होतो. काही कर्मचारीच टेक्नोसॅव्ही नसल्याने कामाची गती संथ होते.