नागपूर : कन्हान जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन कामठी यांना आता विजेची समस्या भेडसावणार नाही. कारण या दोन्ही ठिकाणी अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले ४१ लाख ७३ हजार ४१८ रुपयांचा अतिरिक्त निधी महापालिका देणार आहे. गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी बैठकीनंतर पत्रपरिषदेत माहिती दिली. कन्हान जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन कामठी येथे अखंडित वीजपुरवठा पुरविण्याकरिता कन्हानस्थित २२० के.व्ही. सबस्टेशनमधून ३३ के.व्ही. लेव्हलने आणण्याचा ‘डेडीकेटेड फिडर’व त्या अनुषंगाने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात बदलवायच्या आवश्यक उपकरणे इत्यादीच्या कामासंदर्भात स्थायी समितीने यापूर्वीच ७ कोटी १५ लाख ११ हजार ९४७ च्या खर्चात प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. या ठरावानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र मूळ सर्वेक्षणानुसार वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित केलेल्या मार्गात अनेकदा बदल करावा लागला. नदी ओलांडून फिडर लाईन टाकण्यात येत असल्याने खर्च वाढला. त्यामुळे नियमित वीजपुरवठा होण्यास विलंब होत होता. परिणामी उत्तर आणि पूर्व नागपूरला होणारा पाणीपुरवठा प्रभावित होत होता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने यासाठी ४१ लाख ७३ हजार ४१८ रुपयांच्या अतिरिक्त निधीचा प्रस्ताव पाठविला होता. या अनुषंगाने स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. यामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरातील नागरिकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. पैसे मिळाल्यावर आठ दिवसांत काम पूर्ण होण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी महिनाभरात हे काम होईल. तसे न झाल्यास आवश्यक ती कारवाई करू, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची वीज समस्येतून मुक्ती
By admin | Updated: June 13, 2014 01:23 IST