- एअरपोर्ट शटल बस सेवा : परिवहन समितीला माहिती नाही
राजीव सिंह
नागपूर : नागपूर मनपाने एअरपोर्ट शटल बस सेवेच्या ट्रायलसाठी एक इलेक्ट्रिक बस मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनला दिली आहे. भविष्यात फीडर बस सेवेसाठी आणखी बसेस देण्याची योजना आहे. एअरपोर्ट शटल बस नागपूर मनपा, मेट्रो रेल्वे आणि मिहान इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे संयुक्तपणे चालविण्यात येत आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट शटल सेवेकरिता १० रुपये प्रति प्रवासी भाडे निश्चित केले आहे; पण मेट्रोने गुलाबी रंगाच्या बसचा रंग पांढरा आणि हिरव्या रंगात रूपांतरित केला आहे. याचप्रकारे मोठ्या अक्षरात एअरपोर्ट शटल बस सेवा लिहिले आहे. ट्रायलकरिता घेतलेल्या बसचे स्वरूप पूर्णपणे बदलता येऊ शकते का, असा सवाल या निमित्ताने उभा राहिला आहे.
एवढेच नव्हे, तर एमएमसी कायद्यानुसार जर कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर त्याची माहिती परिवहन समितीला देऊन परवानगी घ्यावी लागते; पण या संदर्भात परिवहन समितीची परवानगी घेतलेली नाही. या उपक्रमासंदर्भात समितीला माहितीच नाही; पण याकरिता मनपाची परवानगी घेतल्याचा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. आयुक्तांनी एक बस दिली आहे, पण स्वरूप बदलण्याची परवानगी दिली आहे का? यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
बसवर पहिला लोगो मेट्रो रेल्वेचा, नंतर मनपा, आपली बस आणि मिहान इंडिया लिमिटेडचा लागला आहे. बसचे संचालन मेट्रो रेल्वेतर्फे करण्यात येत असल्याचे बसकडे पाहताक्षणीच लक्षात येते; पण बस मनपाच्या मालकीची आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनाने शटल बस सेवेसाठी भाड्यावर घेतली आहे.
परिवहन समितीची परवानगी नाही : बोरकर
परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर म्हणाले, एमएमसी कायद्यांतर्गत आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयाला स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते. त्याच प्रकारे परिवहन विभागाशी जुळलेले सर्व प्रकारचे निर्णय परिवहन समितीला घ्यावे लागतात; पण शटल बस सेवेसाठी बस देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे; पण बसचे स्वरूप बदलण्याचे अधिकार कोणत्याही संस्थेला नाही. याकरिता मनपाची परवानगी घ्यावी लागते. जाहिरात धोरणांतर्गत जर संबंधित संस्थेचा प्रचार होत असेल, तर त्याकरिता शुल्क घेण्यात येते. तसे पाहता आरटीओच्या नियमानुसार कोणत्याही बसचा रंग बदलता येत नाही. या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करू.
ब्रॅण्डिंगकरिता घेतली परवानगी : हळवे
मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे म्हणाले, मनपा आयुक्तांच्या परवानगीने एक इलेक्ट्रिक बस एअरपोर्ट शटल बस सेवेच्या ब्रॅण्डिंगसाठी घेतली आहे. प्रायोगिक प्रकल्पांतर्गत प्रवासी मेट्रो स्टेशनपर्यंत सुखरूप जावेत, याकरिता या बसचा उपयोग ब्रॅण्डिंगकरिता करण्यात येत आहे. बसचे स्वरूप बदलण्याच्या प्रकरणात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.