लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ.महेशकुमार साळुंके यांच्यावर लावण्यात आलेल्या आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गंभीरतेने घेतले आहे. साळुंके यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जर साळुंके दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
नागपूरच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे हे स्थाननिश्चितीसह विविध कामांसाठी प्राध्यापकांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचा आरोप फुले-शाहू-आंबेडकर अध्यापक परिषदेने केला. विशेष म्हणजे अनेकदा इच्छा नसतानाही वरपर्यंत रक्कम पोहोचावी लागत असल्याने आपल्याला पैसे घ्यावे लागत असल्याचे अजब उत्तर डॉ. साळुंखे यांनी दिल्याचा आरोपही या परिषदेने केला. उदय सामंत यांच्याकडेदेखील या तक्रारी गेल्या.
शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमादरम्यान उदय सामंत यांनी साळुंके यांची झाडाझडती घेतली. साळुंके यांच्यावरील आरोप गंभीर असून त्याची चौकशी करण्यात येईल. प्रधान सचिव पातळीवरील अधिकाऱ्याकडून पुढील १५ दिवसांत ही चौकशी करण्यात येईल व तो आमच्या विभागाचा नसेल. जर साळुंके दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.
काय होते संघटनेचे आरोप ?
- साळुंके हे पहिल्या स्थाननिश्चितीसाठी वीस हजार , दुसऱ्या व तिसऱ्या स्थाननिश्चितीसाठी तीस हजार व पन्नास हजार रुपयांची मागणी करतात.
- प्राध्यापक जेव्हा सहसंचालकांकडे फाईल घेऊन जातात तेव्हा संचालक पहिल्या भेटीत त्रुटी काढतात व दुसऱ्या भेटीत थेट रक्कम मागतात.
-नागपूरच्या सहसंचालकांनी प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीसाठी आपल्या सोयीसाठी एक यादी तयार केली आहे. त्यातील व्यक्तींनाच स्थानिश्चितीसाठी पाठविले जाते व त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण केली जाते.