जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : लॉकडाऊनमुळे कोट्यवधींचे नुकसान
नागपूर : लॉकडाऊनमुळे ग्रामीण क्षेत्रातील लाकूड उद्योगाला सर्वाधिक नुकसान होत आहे. त्यामुळे लाकूड उद्योग आणि आरा मशीनला अत्यावश्यक सेवेत सहभागी करून सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी विदर्भ रूरल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष फारूख अकबानी यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
अकबानी म्हणाले, विदर्भ रूरल इंडस्ट्रीज असोसिएशन १२५० लघु उद्योग करणाऱ्या उद्योजकांची संस्था आहे. लॉकडाऊनमुळे लाकूड उद्योग आणि आरा मशीन बंद असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ते तणावात आहेत. त्यांच्यावर घरखर्च, भाडे, कर, वीजबिल, बँकांच्या कर्जाचे हप्ते व व्याज, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे संकट आले आहे. त्यामुळे अनेक आरा मशीन बंद झाल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात जवळपास दोन हजार आरा मशीन असून, त्याद्वारे जवळपास २५ ते ३० हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. पण उद्योग बंद असल्याने या लोकांचा रोजगार गेला आहे आणि मालकांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
लाकडाची दुसऱ्या देशातून आयात करण्यात येते आणि उद्योजकांना सरकारी डेपोतून खरेदी करावे लागते. पण लॉकडाऊनमुळे उद्योगाची साखळी तुटली आहे. अनेकजण सर्व व्यवहार फोन, ई-मेलद्वारे करीत आहेत. बॉयलरसाठी भुसा आणि पॅकिंगसाठी लाकडी पट्टे आणि स्मशान घाटावर लाकडाची गरज भासते. आरा मशीन बंद असल्याने लाकूड गोडाऊनमध्ये पडले आहे. उन्हाळ्यात आग लागण्याची जास्त भीती आहे. त्यामुळे लाकूड उद्योग आणि आरा मशीनला अत्यावश्यक सेवेत समावेश करणे आवश्यक असल्याचे अकबानी यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून ही बाब प्रशासनासमोर मांडण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना असोसिएशनचे अध्यक्ष फारूक अकबानी, कॅमिटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल आणि सलीम अजानी उपस्थित होते.