नागलवाडी राऊंडमधील घटना : फॉरेस्टर दोन महिन्यांपासून सुट्यांवर जीवन रामावत नागपूर सध्या नागपूर वन विभागात अवैध वृक्षतोड आणि वाघ-बिबट्यांच्या मृत्यूच्या घटना गाजत असतानाच आता एका फॉरेस्टरने चक्क संयुक्त वन व्यवस्थापन योजनेत लाखो रुपयांचा घोळ केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, एक वाघिण, दोन बिबट आणि दोन हरणांच्या शिकारीने प्रकाशझोतात आलेल्या खापा वन परिक्षेत्रातच हीसुद्धा घटना घडली आहे. माहिती सूत्रानुसार या वन परिक्षेत्रातील केल्वोद येथील फॉरेस्टर एम. के. शिंदे यांच्याकडे नागलवाडी येथील अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. दरम्यान त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन योजनेतर्गंत नागलवाडी येथील लोकांना स्वयंपाक गॅसचे वाटप केले. मात्र त्यात संबंधित फॉरेस्टरने मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर केल्याची चर्चा रंगली आहे. यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नागपूरचे उप वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे फोन उचलला नाही. तसेच खापा येथील वन परिक्षेत्र अधिकारी तागडे यांनीसुद्धा वाघिणीच्या शिकारीच्या घटनेपासून फोन उचलणे बंद केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेवटी सहाय्यक वनसंरक्षक राजन मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फॉरेस्टर शिंदे मागील दोन महिन्यांपासून दीर्घ सुट्यांवर गेले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, शिंदे त्यांच्याकडेच वन व्यवस्थापन समितीचे बँक पासबुक आहे. त्यांनी संबंधित गॅस एजन्सीला धनादेश दिले असल्याची माहिती आहे. मात्र पासबुक शिंदे यांच्याकडे असल्याने या संपूर्ण प्रकरणात नेमके काय घडले, याची अजूनपर्यंत माहिती मिळू शकली नाही. असे त्यांनी सांगितले. परंतु माहिती सूत्रानुसार वन विभागाने बँक खात्यातील आर्थिक व्यवहाराची चौकशी केली असता, त्यात आर्थिक अफरातफर झाली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र यासंबंधी कुणीही बोलण्यास तयार दिसून येत नाही. जाणकारांच्या मते, जंगलाशेजारच्या गावातील लोकांचा जंगलातील हस्तक्षेप कमी व्हावा. शिवाय त्यांची जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी मदत व्हावी, या हेतूने वन विभागाच्या माध्यमातून राज्यात संयुक्त वन व्यवस्थापन ही योजना राबविली जात आहे. यात जंगलाशेजारच्या गावातील लोकांना स्वयंपाक गॅस तसेच दुधाळ गाई-म्हशींचे वाटप केल्या जाते. त्यानुसार नागलवाडी येथील लोकांना गॅस वाटप करण्यात आले आहे.
वन विभागात ‘जेएफएम’ निधीचा घोळ
By admin | Updated: February 4, 2017 02:47 IST