वामनराव चटप : ‘विदर्भ राज्य संकल्पना’ पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन नागपूर : संतुष्ट डुकरांपेक्षा असंतुष्ट सॉक्रेटिस चांगला आहे. कारण त्याच्याजवळ विचारांचे अधिष्ठान आहे. वेगळा विदर्भ मिळविणे हा आपला हक्क आणि अधिकार आहे. हे आपले मिशन आहे. आता विदर्भाची जनता नेत्यांची आश्वासने आणि विकासाच्या गप्पांना भुलणार नाही. विदर्भाच्या आंदोलनाचा वणवा आता पेटला आहे. कुपोषण, रोजगाराची कमतरता, नक्षलवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक प्रश्नांनी विदर्भ चांगलाच होरपळला आहे. आता गोळ्या झेलू, बलिदानाला तयार आहोत पण वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही आणि वेगळा विदर्भ होणारच, अशी घोषणा ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनी शनिवारी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या ‘विदर्भ राज्य संकल्पना’ या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन अॅड. चटप बोलत होते. डॉ. खांदेवाले यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने विदर्भवादी जनतेचे मोठे प्रबोधन झाले. यानंतरचे कार्य आपणा सर्वांना मिळून करायचे आहे. आता बलिदान देऊ पण येत्या पाच वर्षांच्या आत वेगळा विदर्भ झालेला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबीरकुमार चक्रवर्ती म्हणाले, लहान राज्यांमुळे देशाचा विकास युरोपसारखा होऊ शकतो. नुकतेच जर्मनीने हे सिद्ध केले. त्यामुळे वेगळ्या विदर्भाशिवाय आमचा विकास शक्य नाही. या निवडणुकीत विदर्भाच्या जनतेने विरोध करणाऱ्यांना धडा शिकवावा, असे ते म्हणाले. ज्येष्ठ विदर्भवादी नेते नामदेवराव गडपल्लीवार म्हणाले, विदर्भाच्या मागणीला १०९ वर्षे पूर्ण झाली. मी आयुष्यभर विदर्भासाठी लढलो. या काळात अनेक प्रलोभने दिली पण मी बधलो नाही. पश्चिम महाराष्ट्राला विदर्भाचे हित नव्हे तर फक्त शोषण कळते. पण त्यांना एक दिवस वेगळा विदर्भ द्यावाच लागेल. विसा बुक्सचे प्रकाशक विनोद लोकरे म्हणाले, हे पुस्तक अत्यंत अभ्यासपूर्ण असून त्याची देशात प्रशंसा झाली आहे. डॉ. खांदेवाले म्हणाले, गडपल्लीवार गेली अनेक वर्षे विदर्भाच्या संदर्भातील बातम्याचे कात्रण जपून ठेवतात. त्यामुळेच प्रणवदा एकदा बोलले होते, मी विदर्भाच्या बाजूने आहे. ते राष्ट्रपती झाल्यावर त्यांना हे कात्रण दाखवून आम्ही आठवण करून दिली आणि निवेदन दिले. म. गांधी म्हणाले होते, विरोधक प्रारंभी एखाद्या मागणीकडे दुर्लक्ष करतात.नंतर टीका करतात आणि त्यानंतर मौन धारण करतात. त्यांच्या टीकेला उत्तरे आता देऊन झाली आहेत त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आता सारे मौन धरून आहेत. पण वेगळा विदर्भ होणारच आहे. आंदोलनात प्रतिसाद मिळत नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही. हा वणवा विरोधकांना शमविल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी उमेश चौबे, राम नेवले,अॅड. मुकेश समर्थ आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती ठाकरे यांनी तर आभार कांबळे यांनी मानले. (प्रतिनिधी)
गोळ्या झेलू, पण वेगळा विदर्भ घेणारच
By admin | Updated: August 31, 2014 01:15 IST