चंद्रशेखर बावनकुळे : भारतीय विद्या भवनतर्फे ‘बालदरबार’ महोत्सवाचे आयोजननागपूर : अभ्यासासोबतच मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असते. यामुळे मुलांमध्ये लपलेले ‘टॅलेन्ट’ समोर येते असे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. भारतीय विद्या भवन्सतर्फे ‘बालदरबार’ या पाच दिवसीय भव्य ‘ड्रामा फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘आयएमए’ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या ‘बालदरबार’मध्ये ४५० विद्यार्थी ३० निरनिराळ्या नाट्यांचे सादरीकरण करणार आहेत.याप्रसंगी माजी खासदार व भगवानदास पुरोहित विद्या मंदिरचे चेअरमन बनवारीलाल पुरोहित, वरिष्ठ प्राचार्या अन्नपूर्णी शास्त्री, प्रा.क्यू.एच.जीवाजी, डॉ.ए.के. मुखर्जी, सचिव सुनंदा सोनारीकर, कोषाध्यक्ष के.एम.अग्रवाल, डॉ.रमेश चांडक, भवन्स सिव्हिल लाईन्स शाखेच्या प्राचार्यां अंजू भुतानी, आष्टी शाखेच्या प्राचार्या वंदना बिसेन, त्रिमूर्तीनगर शाखेच्या प्राचार्या पार्वती अय्यर, सहसंचालक टी.एल.राजा आणि रजिस्ट्रार विजय ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला ‘स्किल्ड’ युवापिढीची आवश्यकता आहे व त्यासाठी लागणारा आत्मविश्वास अशा कार्यक्रमांतून निर्माण होतो. शाळेतील विद्यार्थी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न नक्कीच साकार करतील असे बावनकुळे म्हणाले. ‘बालदरबार’च्या संकल्पनेला राबविण्याबद्दल पुरोहित यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. सरबानी बोस यांनी संचालन केले तर आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.ए.के.मुखर्जी यांनी आभार मानले. मनोरंजनातून सामाजिक संदेशपहिल्या दिवशी पाच नाट्यांचे सादरीकरण झाले. भवन्स बीपी विद्या मंदिर, आष्टी येथील विद्यार्थ्यांनी ‘प्रदुषण के शोले’ या नाट्यातून उपस्थितांना मनोरंजनाद्वारे सामाजिक संदेश दिला. यात निरनिराळे गॅजेट्स तसेच दैनंदिन उपयोगाच्या अनेक वस्तूंपासून प्रदूषण कसे वाढते याचे सादरीकरण करण्यात आले. भवन्स बीपी विद्या मंदिर, त्रिमूर्तीनगर येथील विद्यार्थ्यांनी ‘किशोरावस्था : आखीर क्यों’ या नाट्यातून करिअर निवडताना विद्यार्थ्यांवर पालकांचा किती दबाव असतो यावर प्रकाश टाकला. मिलेनिअम स्कूल, फेटरी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘सेव्ह वॉटर’ या नाट्यातून पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला. तर बुटी पब्लिक स्कूल, कळमना येथील विद्यार्थ्यांनी ‘डोन्ट टीच मी- आय एम’ या नाट्याने उपस्थितांना खिळवून ठेवले. ‘अडोलसेन्स’ या हिंदी नाट्यातून विद्यार्थी सोशल नेटवर्किंगच्या जाळ्याच्या माध्यमातून वाईट संगतीकडे कसे ओढले जात आहेत यावर भाष्य करण्यात आले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे आवश्यक
By admin | Updated: January 21, 2015 00:22 IST