नागपूर : पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न करणे अवैध आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अकोला येथील श्वेता व समीर यांचे २९ एप्रिल २०१५ रोजी लग्न झाले होते. हे श्वेताचे दुसरे लग्न होते. परंतु, हे लग्न करताना तिचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला नव्हता. दरम्यान, श्वेता व समीरचे एकमेकांसोबत पटेनासे झाल्यानंतर समीरने ७ फेब्रुवारी २०१७ रोजी श्वेतासोबतचे लग्न अवैध घोषित करण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. तेथे श्वेताला पहिल्या पतीसोबत कायदेशीर घटस्फोट झाल्याचे सिद्ध करता आले नाही. परिणामी, कुटुंब न्यायालयाने समीरची याचिका मंजूर करून त्याचे श्वेतासोबतचे लग्न अवैध ठरवले. त्या निर्णयाविरुद्ध श्वेताने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न करणे अवैध असल्याचे सांगून श्वेताचे अपील फेटाळून लावले.