- योगेश पांडे
नागपूर,दि.11 - आजकालची तरुणाई सामाजिक जबाबदारीपासून दूर पळते आहे, अशी नेहमी ओरड करण्यात येते. मात्र समाजात असेही काही तरुण आहेत, जे ‘समाजसेवा हीच राष्ट्रसेवा’ असे मानून नि:स्वार्थपणे कार्य करण्यावर विश्वास करतात. शहरातील युवा पिढीतील अशाच पाच प्रतिनिधींनी एकत्र येऊन विधायक संकल्प घेतला व शहरातील अपघातप्रवण धोकादायक ठिकाणांवर संरक्षण व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला. केवळ यावरच ते थांबले नाहीत, तर अपघातांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका पुलावर संरक्षक कठडेदेखील उभारुन प्रशासनाच्या डोळ््यात झणझणीत अंजन टाकले आहे.
गौरी पौनीकर, आशिष काळे, पियुष बोईंनवार नितीन बहादुरे आणि सागर गंधर्व अशी ही या पाच जणांची नावे आहेत. सामाजिक कार्याची अगोदर पासूनच आवड असणारे ते तरुण-तरुणी एकत्र आले. शहरातील अनेक भाग अपघातस्थळ बनले आहेत. मात्र प्रशासनाचे त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा नागरिक म्हणून आपले देखील कर्तव्य आहे, या भावनेतून या सर्वांनी ‘नेशन फर्स्ट’अंतर्गत यासंदर्भात पुढाकार घेण्याचे ठरविले.
शहरातील मानेवाडा चौकाजवळील रिंगरोडवर असलेल्या पुलाचे कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले होते. रात्रीच्या वेळी अनेक जणांचा येथे अपघात झाला असून आतापर्यंत ८ हून अधिक जणांचा जीव गेला आहे. दररोज तेथून हजारो वाहने जात असतात. परंतु पुलावर कठडे नसल्याने हा पूल धोकादायक बनला होता. या पुलावर सरंरक्षण भिंत उभारावी, यासाठी वारंवार स्थानिकांनी संबंधित विभाग व प्रशासनाचे लक्षही वेधले.
या पाच जणांनी येथे नववर्षाच्या मुहूर्तावर तात्पुरते कठडे उभारून संरक्षण व्यवस्था उभारली. यासाठी त्यांनी लोकांना सहजपणे दिसतील असे कठडे उभारले व पोलिसांना विनंती करुन येथे ‘बॅरिकेट्स’देखील लावले. शिवाय तात्पुरत्या कठड्यांना ‘रिफ्लेक्टर्स’देखील लावण्यात आले आहेत. या मार्गावर अनेकदा रात्री अंधारच असतो. त्यामुळे आता तात्पुरती संरक्षण व्यवस्था उभी झाल्याने येथे धोका आहे, हे नागरिकांना सहजपणे लक्षात येत आहे. हे कठडे उभारण्यात आल्यापासून येथे एकही अपघात झालेला नाही हे विशेष.