मनोज झाडे
वानाडोंगरी : हिंगणा तालुक्यातील राजूनगर येथील शिवकुमार कनोजे हा १८ वर्षीय दिव्यांग (गतिमंद) युवक महिन्याभरापूर्वी अचानक घरून निघून गेला. घरी आई व बहीण एवढेच त्यांचे कुटुंब. नेहमीप्रमाणे या वेळीही तो घरून निघून गेल्याने परत येईल, या आशेने आईने पोलिसांत तक्रार दिली नाही. मात्र यावेळी तो युवक नागपूर पासून ८० किलोमीटर अंतरावरील गिरड या गावात पोहोचला होता. गिरड पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला हा युवक फिरू लागला. दिव्यांग असल्याने त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. मात्र गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील दहिभाते यांची नजर या युवकावर पडली. त्याला जेवण देत त्याची परिसरात झोपण्याची व्यवस्था केली. यानंतर त्याच्याशी जवळीक साधून माहिती विचारण्याचा प्रयत्न सुरू केले. या युवकाबाबत कुठे मिसिंगची तक्रार दाखल आहे का, याची शहानिशाही गिरड पोलिसांनी केली. मात्र कुठेही तक्रार दाखल नसल्याने तो कुठला राहणारा आहे, हे कळत नव्हते. मात्र एके दिवशी या युवकाच्या तोंडून ‘जीवनधारा मतिमंद शाळा’ हे शब्द निघाले. यावरून ठाणेदार सुनील दहिभाते यांनी या शाळेचा शोध घ्यायला सुरुवात केली. नागपूर येथील काटोल नाका येथे ही शाळा असल्याचे त्यांना कळले. त्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून संबंधित युवकाचे वर्णन केले. शिवकुमार असे या युवकाचे नाव कळल्यावर तो राजूनगर येथील रहिवासी असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर गिरड पोलिसांनी हिंगणा एमआयडीसी पोलीस ठाणे येथील ठाणेदार युवराज हांडे यांच्याशी संपर्क साधून संबंधित युवकाचे घर शोधण्याची विनंती केली. ठाणेदार युवराज हांडे यांनी शिवकुमार याचे घर शोधले आणि गिरड पोलिसांना याबाबत अवगत केले. पोलीस निरीक्षक सुनील दहिभाते यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे, हिंगणा येथे युवकाला त्याच्या आई व बहिणीच्या स्वाधीन केले. संबंधित युवक बेपत्ता असल्याची कुठलीही तक्रार नसताना केवळ माणुसकीचे नाते जपत दहिभाते यांनी दाखविलेल्या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
--
हा युवक आमच्या गिरड पोलीस ठाण्याच्या परिसरात दिसला. तेव्हापासून त्याला दोनवेळचे जेवण देऊन त्याची झोपण्याची व्यवस्था केली. हवालदार संजय त्रिपाठी व देवेंद्र उडान यांनी त्याची अनेकदा अंघोळही घालून दिली. आम्ही केवळ माणुसकीच्या नात्याने त्याला मदत केली आणि त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचविले.
- सुनील दहिभाते, पोलीस निरीक्षक, गिरड