लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्प व्याजदराच्या कर्जाचे आमिष दाखवून नागरिकांचे लाखो रुपये हडपणाऱ्या टोळीतील एका महिलेला अजनी पोलिसांनी अटक केली. पूजा मॅडम ऊर्फ पूजा सिंग (वय ५३), असे या आरोपी महिलेचे नाव आहे.
पूजा हरियाणातील हिसार जिल्ह्यातील लाडवा येथील रहिवासी आहे. कमी व्याज दराचे दीर्घ मुदतीचे लाखो रुपयांचे कर्ज झटपट उपलब्ध करून देण्याची थाप मारून वेगवेगळ्या सबबी सांगत लाखो रुपये उकळणारी टोळी पूजा आणि तिचे साथीदार अनेक दिवसापासून संचलित करीत आहे. त्यांनी देशातील विविध प्रांतात अनेकांना अशा प्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या देवानंद अनिल शेंडे यांना या टोळीने आठ लाखांचे कर्ज १० वर्षांकरिता केवळ ६.९ टक्क्याने उपलब्ध करून देण्याची आरोपी पूजा आणि तिच्या साथीदारांनी थाप मारली होती. आपण बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचीही बतावणी पूजाचे साथीदार आरोपी विकास जैन, दीपक चव्हाण, संजीव कुमार, ओम प्रकाश (रा. जेपी नगर, हरियाणा) यांनी केली होती.
शिंदे यांना आधी कागदपत्रे मागून नंतर वेगवेगळे कारण सांगत आरोपींनी त्यांच्याकडून ९८ हजार रुपये उकळले. कर्ज उपलब्ध करून देण्याऐवजी प्रत्येक वेळी पैसे जमा करण्यास सांगणाऱ्या या टोळीचा संशय आल्यामुळे शेंडे यांनी ‘कर्ज नको, माझी रक्कम मला परत करा’ असे आरोपींना म्हटले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेंडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी शेंडे यांनी जमा केलेली रक्कम कोणत्या खात्यात वळती झाली, त्याचा पत्ता काढून त्याआधारे पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. पूजा सिंग नामक महिला आरोपीला तिच्या हरियाणातील गावात जाऊन १६ ऑगस्टला पोलिसांनी अटक केली.
---
चार दिवसाचा पीसीआर
पूजाला न्यायालयात हजर करून तिचा चार दिवसाचा पीसीआर मिळविण्यात आला. तिच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
---