कर्मचारी संपाचा परिणाम : साग तस्करीला आले उधाणगणेश वासनिक - अमरावतीवनरक्षक, वनपालांच्या बेमुदत संपामुळे जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाच्या नाक्यावर मनुष्यबळाचा अभाव असल्याने या नाक्यांवरुन साग तस्करीला उधाण आले आहे. आंतरराज्यीय वन नाक्यावर अधिकारी बेपत्ता असल्याने मध्य प्रदेशात सागवान वृक्षांची कटाई करुन ते चोरट्या मार्गाने पाठविले जात आहेत. मेळघाट, चंद्रपूर या भागांतून सर्वाधिक साग तस्करी होत असल्याची माहिती आहे.राज्यभरातील २५ हजार वनपाल, वनरक्षक वेतनवाढीच्या मुद्यावरुन २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा आजचा सातवा दिवस असताना शासन कोणताही तोडगा काढण्याच्या निर्णयापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे संपकरी वनरक्षक, वनपालदेखील वेतन वाढीसाठी अडून बसल्याचे चित्र आहे. वनपाल, वनरक्षकांच्या म्हणण्यानुसार, जंगल, वनांचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोकडे वेतन देण्यामागील शासनाने भूमिका स्पष्ट करावी. राज्य शासनाला दरवर्षी वनविभागाकडून कोट्यवधीचे उत्पन्न मिळत असताना वेतनवाढीच्या न्याय्य मागणीला नकार देणे संयुक्तिक नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे संपामुळे गेल्याने मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांवर जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी आपसुकच आली आहे. मात्र वनपाल, वनरक्षक हा वनविभागात अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने संपकाळात एखादी घटना घडल्यास कायदेशीर कारवाईची बाजू कोणी हाताळावी, हा खरा सवाल उपस्थित होत आहे. या संपामुळे वरिष्ठ वनअधिकारी हतबल तर तस्करांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जारीदा, हतरु, चौराकुंड, हरिसाल, भोकरबर्डी, खटकाली, मेमना, सेमाडोह, ढाकणा, धारगड, कोकटू, कोहा, धामणगाव गढी, बोराडा या नाक्यावरुन साग तस्करी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. या नाक्यावर नाममात्र वनमजूर कार्यरत असून या मजुरांना वाहने अडविणे किंवा तपासणीचे कोणतेही अधिकार नसल्याने हे नाके हल्ली केवळ शोभेच्या वास्तू ठरत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून महाराष्ट्र ते मध्य प्रदेशात जाणारा राज्य मार्ग रात्रीच्या वेळी सुरु राहता कामा नये, अशी शासन नियमावली आहे. मात्र या संपाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मध्यप्रदेशात जाणारा राज्य मार्ग रात्रीला बिनदिक्कतपणे सुरु असून साग तस्करी होत आहे. मागील सात दिवसांच्या या संपामुळे वनविभागाची कोट्यवधीची वनसंपदा चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. मेळघाटातील राज्य मार्ग खुला झाल्याने वाघ तस्करी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जंगलातही सागतस्करी वाढली असून आंध्रप्रदेशात चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे.
वन विभागाचे आंतरराज्यीय नाके सताड उघडे
By admin | Updated: September 1, 2014 01:05 IST