नागपूर : मुलींचा जन्मदर वाढविण्यासोबतच तिच्या शिक्षण व आरोग्य सुधारणेसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या 'सुकन्या योजने'तील विभागातील लाभार्थी ३५७ मुलींचा विमा काढण्यात आला आहे. या योजनेमुळे वयाची १८ वर्षे पूर्ण होताच लाभार्थी मुलीला एक लाख रुपये मिळतील. १ जानेवारी २0१४ पासून दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी ही योजना असून दोन मुलींपर्यंत योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलीचा जन्म होताच अंगणवाडी सेविका याची नोंद महिला बालविकास प्रकल्प विभागाकडे करते. या मुलीच्या नावाने राज्य सरकार विमा काढणार आहे. त्यासाठी २१ हजार २00 रुपये एका वेळी जमा केले जाणार आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला एक लाख मिळेल. त्यापूर्वी तिचा मृत्यू किंवा विवाह झाल्यास सर्व रक्कम शासनाच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे ९ वी ते १२ पर्यंत ६00 रुपये शिष्यवृत्ती सहा महिनाप्रमाणे दिली जाईल. १00 रुपये शुल्क भरून मुलीच्या पित्याच्या नावेही विमा काढण्यात येणार आहे. पालकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३0 हजार, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार, अपघातात दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार, एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५00 रुपये मिळणार आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत ३५७ मुलींचा या योजनेअंतर्गत विमा काढण्यात आला आहे. सर्वाधिक वर्धा जिल्ह्यात २७४, भंडारा जिल्ह्यात ६२, चंद्रपूर (शहर) मध्ये १७, नागपूर (शहर)मध्ये ५३, गडचिरोली (शहर) मध्ये ४ मुलींना याचा लाभ मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत एकाही मुलीची नोंदणी याअंतर्गत करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)
'सुकन्ये'ला विम्याचे कवच
By admin | Updated: May 9, 2014 02:44 IST