नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्यावतीने नझुल कॉलनी जरीपटका येथील हर्षवर्धन बौद्ध विहाराच्या पटांगणावर राज्यघटनेच्या उद्देशिकेची नोंद असलेला भव्य शिलालेख तयार करण्यात आला आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता टिकून आहे. त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हाच हेतू जोपासत व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी या उद्देशाने उत्तर नागपुरातील हर्षवर्धन बौद्ध विहाराच्या पटांगणावर १५ फूट उंचीच्या आकर्षक स्तंभावर राज्यघटनेच्या उद्देशिकेची नोंद असणारा शिलालेख तयार करण्यात आला आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी दुपारी १ वाजता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या शिलालेखाचे लोकार्पण करण्यात येईल. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यापसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील. महापौर प्रवीण दटके अध्यक्षस्थानी राहतील. आ. अनिल सोले आवर्जून उपस्थित राहतील. या शिलालेखाच्या उभारणीच्या कार्याची पाहणी महापौर प्रवीण दटके यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल, संदीप जाधव, झोन सभापती राजू थूल यांनी नुकतीच केली. (प्रतिनिधी)
संविधान उद्देशिकेचा शिलालेख
By admin | Updated: November 21, 2015 03:30 IST