विद्यापीठातील नाणी गायब प्रकरण : ‘सीबीआय’ कार्यालयाचे पत्रनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याचे प्रकरण आता ‘एसीबी’कडे (अॅन्टी करप्शन ब्युरो) वर्ग करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रा. सुनील मिश्रा यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. विभागाने हे प्रकरण चौकशीसाठी ‘एसीबी’कडे वर्ग केले आहे.१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली २०० हून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबत तत्कालीन प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी चौकशी समिती गठित केली होती. या समितीने अहवाल सादर केला होता. परंतु हे प्रकरण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आल्यानंतर हा अहवालच सापडत नव्हता. हा अहवाल सापडल्यानंतर विभागातून २१६ नाणी तसेच अनेक दुर्मिळ वस्तू गायब झाल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत विद्यापीठाने बऱ्याच कालावधीनंतर पोलीस तक्रार दाखल केली.दरम्यान, नाणी गायब झाल्याप्रकरणी प्रा. सुनील मिश्रा यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ चे कलम १७ (८) अनुसार कुलसचिव संबंधित विभागातील विद्यापीठ आणि देशाच्या मौलिक ठेव्याचे अभिरक्षक असून यासंदर्भात तक्रार दाखल करणे त्यांचीही जबाबदारी होती. परंतु, त्यांनी पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. शिवाय कुलगुरू, वित्त व लेखा अधिकारी, विभागप्रमुख यांनीदेखील आपली जबाबदारी निभावली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मिश्रा यांनी केली होती. मिश्रा यांची तक्रार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे ‘एसीबी’कडे वर्ग करण्यात आली. यासंदर्भात ‘एसीबी’ला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या प्रकरणाची कुठलीही चौकशी केली नसून कुठली कार्यवाही करायची असल्यास कळविण्यात यावे, असे या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
नाण्यांची चौकशी ‘एसीबी’कडे
By admin | Updated: June 29, 2016 02:53 IST