जलालखेडा : ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेंतर्गत नरखेड तालुक्यात विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे नाली, पूल, रस्ते बांधकाम करण्यात आले असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. लॉकडाऊन काळात दळणवळण बंद असल्याचा फायदा घेत अधिकारी व ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची बांधकामे करून लोककल्याणासाठी आलेल्या निधीचा गैरवापर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घोगरा ते हिवरमठ, लोहारीसावंगा-हिवरमठ-रामठी, दावसा ते बानोरचंद्र, खरबडी-मालटेकडी- मेंढला या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या सर्व कामांमध्ये डस्टचा वापर करण्यात आला आहे. पुलाच्या कामात फुटली पायली टाकून त्यावर टिनाचे पत्रे टाकून लिपापोती करण्यात आली आहे. तसेच लोह्याऐवजी बांबूचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केल्यामुळे सिमेंट रोडला भेगा पडल्या आहेत. डांबरी रोडवर गवत उगवले आहे. नालीला भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची मागणी मयूर दंढारे, अक्षय ईरखडे यांनी केली आहे. यासंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकारी अन्सारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST