लाेकमत न्यूज नेटवर्क
कनहान : लहान मुलांना न्युमोकोकल या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. या लसीकरण अभियानाचा कन्हान (ता. पारशिवनी) प्राथमिक आराेग्य केंद्रातून नुकताच जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, पंचायत समिती सभापती मीना कावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी (अतिरिक्त) डाॅ. साळवे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत वाघ, करुणा भोवते, बळवंत पडोळे, सतीश घारड उपस्थित होते. प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चौधरी यांनी प्रास्ताविकातून मुलांना हाेणारा न्युमोकोकल आजाराबाबत माहिती देत त्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काेराेना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन ‘पीसीव्ही’ लसीमध्ये समाविष्ट केल्याचे सांगितले.
न्युमोकोकल हा स्टेप्टोकोकस निमोनिया या बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. हे बॅक्टेरिया शरीरातील विविध भागात पसरून वेगवेगळे आजार निर्माण करतात. हा बॅक्टेरिया पाच वर्षाखाली मुलांमध्ये निमोनियाचे प्रमुख कारण असल्याचे डाॅ. याेगेश चाैधरी यांनी सांगितले. न्युमोकोकल हा आजार दाेन वर्षापर्यंतच्या बालकात दिसून येतो. एक वर्षाखाली बालकांना या आजाराचा धाेका सर्वाधिक असतो. हा आजार टाळण्यासाठी ‘पीसीव्ही’ लसीकरणाप्रभावी आहे. या लसीचा पहिला डोस सहा आठवड्यात, दुसरा डोस १४ आठवड्यानंतर आणि नंतर नवव्या महिन्याला ‘पीसीव्ही’ बुस्टर डोस देण्यात येईल, अशी माहिती डाॅ. साळवे यांनी दिली.
या आजाराचा संसर्ग मुलांच्या श्वसन नलिकेला हाेत असून, यामुळे मुलांच्या फुप्फुसांवर सूज येत असून, त्यात पाणी तयार हाेते. त्यामुळे मुलांना श्वास घेण्यास त्रास हाेताे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ शकते. खोकला, धाप लागणे, फीट येणे, बेशुद्ध होणे आदी लक्षणेही या आजारात दिसून येतात, अशी माहिती डाॅ. प्रशांत वाघ यांनी दिली. पालकांनी त्यांच्या मुला-मुलींचे लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन रश्मी बर्वे यांनी केले. कार्यक्रमाला सुरेंद्र गिरे, माया कमाले, माया हरडे, कांचन हटवार, वंदना भोस्कर यांच्यासह आराेग्य विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित हाेते.