लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीची तिच्या पतीने अमानुष हत्या केली. सोमवारी सकाळी या घटनेचे वृत्त एमआयडीसीतील भीमनगरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. दीप्ती अरविंद नागमोती (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून तिची हत्या करून पसार झालेल्या आरोपीचे नाव अरविंद अशोक नागमोती (वय ३०) आहे.
मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला आरोपी एमआयडीसीत कामाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्याच्या दीप्तीसोबत त्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे दोघे एमआयडीसीतील भीमनगरात भाड्याच्या खोलीत राहायचे. आरोपी अरविंद बाहेरख्याली वृत्तीचा आहे. लग्न झाल्यानंतरही तो त्याच्या प्रेयसीच्या संपर्कात होता. त्याचे अनैतिक संबंध दीप्तीला दोन आठवड्यांपूर्वी माहीत झाले. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचा वाद निर्माण झाला. रोजच त्यांच्यात कटकटी होऊ लागल्या. अनैतिक संबंध तोडल्याशिवाय घरात यायचे नाही, असा पवित्रा दीप्तीने घेतल्याने रविवारी सकाळपासून या वादाने भलतेच वळण घेतले. दोघांपैकी कुणीच नमते घ्यायला तयार नसल्याने त्यांच्यात दिवसभर भांडण सुरू होते. दरम्यान, दीप्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरच्यांनाही अरविंदच्या अनैतिक संबंधांची कल्पना दिली होती. त्यामुळे दोघांना समजावण्याच्या हेतूने दीप्तीचा भाऊ शुभम वामनराव ठाकरे (वय २०, रा. कुरखेडा), आरोपी अरविंदचे वडील आणि अन्य एक नातेवाईक रविवारी दुपारी नागपूरकडे निघाले.
अन् शंका खरी ठरली
प्रवासादरम्यान शुभमने दीप्तीच्या मोबाइलवर वारंवार संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आरोपीने तिचे काही बरेवाईट तर केले नसावे, असे त्याला वाटत होते. सोमवारी पहाटे १.२०च्या सुमारास शुभम आणि त्याचे दोन नातेवाईक आरोपी राहत असलेल्या घरी पोहोचले. तेव्हा दारात पाय ठेवताच त्याची शंका खरी ठरली. दीप्ती पलंगावर पडून होती. तिच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. आरोपी अरविंद आजूबाजूला दिसत नव्हता. त्यामुळे शुभमने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. दीप्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी मृतदेह मेडिकलला रवाना केला. शुभमच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अरविंदचा शोध घेतला जात आहे.