- अर्थसंकल्पात रोजगार संधी व महसूल वाढीवर भर : आयकराचे टप्पे निश्चितच वाढणार
नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षात देशाने कोरोनाचे संकट अनुभवले. कोरोनाचा सामना करण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. एका बाजूला आरोग्य सुविधांवर मोठा खर्च करावा लागला. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असेल. त्यामुळे अर्थमंत्री पायाभूत सुविधा, संरक्षण सिद्धता आणि शेती आधारित मूलभूत पॅकेज शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात नक्कीच देणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घोषणा अर्थसंकल्पात होणार आहेत.
उत्पादनात वाढ झाली तर विकासाचा अपेक्षित दर साध्य करता येतो. त्यामुळे रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त निर्माण व्हाव्यात आणि महसुलात वाढ व्हावी, यावर अर्थमंत्री भर देणार आहेत. याशिवाय पायाभूत सुविधा अर्थात रेल्वे, रोड, धरणे, सिंचन यांच्या विकासासाठी अर्थमंत्री विविध धोरणे आणि योजनांची घोषणा करतील. याशिवाय संरक्षण सिद्धतेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतीय लष्कराला लागणाऱ्या वस्तू भारतीय बनावटीच्या खरेदीवर अर्थमंत्री सर्वाधिक भर देणार आहेत. देशांतर्गत वस्तू खरेदीतून सरकारला आयकर मिळेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री शेती आधारित मूलभूत पॅकेज शेतकऱ्यांना नक्कीच देतील. शेतमालाला भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे राहतील. शेतमालाच्या संदर्भात दीर्घकालीन धोरणाची अर्थसंकल्पात नक्कीच घोषणा होणार आहे. गेल्यावर्षी आयकरदात्याला पर्याय दिले होते. त्यामुळे करदाता सुरक्षित नव्हता. करदात्याला कररचना सुटसुटीत हवी आहे. त्यानुसार यंदा आयकराची मर्यादा नक्कीच वाढणार आहे. तसे पाहता शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राकडून रोजगार निर्मिती जास्त होत नाही. शेती, उद्योग, संरक्षण ही रोजगार निर्मितीची प्रमुख क्षेत्रे आहेत. त्यात मायनिंग, फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्राला अर्थसंकल्पात प्रोत्साहन मिळणार आहे. याकरिता जास्त निधी मंजूर होणार असून यंदाचे बजेट युनिक राहणार असल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.
रोजगारावर सर्वाधिक भर ()
कोरोना काळात उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने अनेकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प रोजगाराभिमुख राहणार आहे. पायाभूत सुविधा, संरक्षण सिद्धता आणि शेती आधारित मूलभूत पॅकेजवर जास्त भर राहील. या क्षेत्रांसाठी विविध पॅकेजची घोषणा नक्कीच होणार आहे. आत्मनिर्भरमध्ये संरक्षण क्षेत्रावर जास्त भर राहणार आहे. त्यामुळे जास्त आयकर सरकारला मिळेल.
सीए मिलिंद कानडे, उपाध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असोसिएशन.
आयकराचे टप्पे नक्कीच वाढविणार ()
कोरोना महामारीमुळे अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला जास्त निधी मिळणार आहे. याशिवाय लोकांची क्रयशक्ती वाढविणे व अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आयकर टप्पे वाढवून महिलांना दिलासा मिळणार आहे. महिलांसाठी सर्वाधिक योजना आणि संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक भर राहील. रोजगार वाढीसाठी एमएसएमई क्षेत्र विस्तृत करण्यावर भर राहणार आहे. काही योजनांची घोषणा होईल.
सीए किरीट कल्याणी, अध्यक्ष, आयसीएआय, नागपूर शाखा.
आरोग्य व पायाभूत सुविधांचा विचार ()
यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक ठोस निर्णय येणार आहेत. अर्थव्यवस्था वाढीस कशी लागेल, याचा विचार होणार आहे. जीएसटीचे कलेक्शन वाढले आहे. आता लोकांची क्रमशक्ती वाढविण्यासाठी आयकर टप्पे वाढतील. आरोग्य क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्रावर अर्थमंत्री जास्त भर देणार आहे. याकरिता जास्त निधी मंजूर होईल. इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, कॅमिट.
एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार ()
यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी काही प्रोत्साहनपर योजना येणार आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. ते पुनर्स्थापित करण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेईल. याशिवाय आरोग्य, संरक्षण आणि पायाभूत सुविधांवर जास्त भर राहील. सुदृढ अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मिती यावर सरकारचे विशेष लक्ष राहील.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए इंडस्ट्री.