शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात अधिक उत्तम समन्वय ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील एकूण परिस्थिती बघता रात्रीच यासंदर्भातील माहिती प्रत्येक नागरिकाला आता वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी नागपूर जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट नागपूर डॉट जीओव्ही डॉट इन ' वर ही माहिती उपलब्ध केली जात आहे. '
या संदर्भातील माहितीचा एक व्हिडिओ रात्री उशिरा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जारी केला असून यामध्ये जिल्ह्यामध्ये यापुढे डेडिकेटेड कोविड सेंटरला रेमडेसिवीरचा पुरवठा केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. अन्य ठिकाणी पुरवठा आवश्यकता व गरज लक्षात घेऊन केला जाईल. खासगी हॉस्पिटलमध्ये गरज नसताना या इंजेक्शनचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एसपीओटू ९३ पेक्षा कमी असताना, श्वास घ्यायला त्रास होत असताना आणि एचआरसीटी स्कोअर ८ पेक्षा जास्त असणाऱ्या कोरोना बाधिताला या इंजेक्शनची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या सोबतच त्यांनी जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. १० एप्रिल रोजी ९० ते ९५ टन ऑक्सिजन साठा सध्या उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचे वितरण कोविड रुग्णालयाला केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.