लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिस्पर्ध्याला पोलीस कारवाईत अडकवण्यासाठी त्याच्या मोबाइलच्या दुकानात अमली पदार्थ ठेवणारा कुख्यात गुन्हेगार बग्गा याला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
वर्षभरापासून पोलिसांना तो गुंगारा देत होता.
कोट्यवधीच्या वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणातून बग्गा आणि त्याच्या प्रतिस्पर्धी गुन्हेगारांमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धडा शिकवण्यासाठी बग्गाने एका मोबाइलच्या दुकानात एमडीच्या पुड्या ठेवून पोलिसांना टीप दिली होती. पोलिसांनी मोबाइल शॉपीमध्ये छापा टाकला. संचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याला फसविण्यासाठी अज्ञात आरोपीने साथीदारामार्फत मोबाइल शॉपीत एमडीच्या पुड्या ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले. या कटकारस्थानाचा सूत्रधार बग्गा असल्याचे पोलीस तपासात उघड होताच पोलिसांनी बग्गाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून बग्गा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तो नांदेडमध्ये दडून असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी बग्गाला ताब्यात घेतले.
---
तीन दिवस पीसीआर
त्याला आज नागपुरात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा तीन दिवसांचा पीसीआर मंजूर केला.
---