योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकेच्या शिक्षणप्रणालीत वाढणाऱ्या भारतीय मूळाच्या मुलांना देशाची संस्कृती कळणे व परंपरांशी ते जोडले जाणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित एचएसएसतर्फे (हिंदू स्वयंसेवक संघ) पुढाकार घेण्यात आला व अमेरिकेतील ७३ शहरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने कुठे ऑनलाईन तर कुठे ऑफलाईन पद्धतीने गुरुवंदना करण्यात आली व तेथील शिक्षकांना सन्मानितदेखील करण्यात आले. तेथील शिक्षकांना यानिमित्ताने भारतीय परंपरेचे अनोखे दर्शन घडले.
भारताच्या गुरुशिष्य परंपरेशी जुळलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त एचएसएसतर्फे दरवर्षीच अंतर्गत स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व त्यात प्रामुख्याने तेथे स्थानिक झालेले एनआरआय सहभागी होतात. कोरोनाचे संकट कायम असले तरी यंदादेखील तेथील शाळांमध्ये आयोजन करण्याचा संकल्प घेण्यात आला. जास्तीत जास्त शिक्षकांना सन्मानित करण्याचा प्रयत्न होता व त्यादृष्टीने गुरुवंदना या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. कोरोनामुळे अनेक बहुतांश ठिकाणी याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले.
अमेरिकेत मे महिन्याचा पहिला आठवडा हा शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच आठवड्यातील पहिला मंगळवार हा राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो. यालाच भारतीय परंपरेने पुढे नेत गुरुवंदनेचे आयोजन केले होते. २४ प्रांतांमधील ७३ शहरांत एकूण ९९ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही शहरात एकाहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले. यादरम्यान सुमारे १७०० शिक्षकांना भारतीय परंपरेनुसार सन्मानित करण्यात आले.
ऑनलाईन आयोजनातदेखील उत्साह
कोरोनामुळे अनेक शहरात विविध आयोजनांबाबत स्थानिक आरोग्य विभागाने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे एचएसएसच्या बहुतांश शाखांनी ऑनलाईन आयोजन केले. मात्र गुरुवंदनेला जिव्हाळ्याचा स्पर्श व्हावा यासाठी मुलांनी शिक्षकांसाठी शुभेच्छापत्र व भेटवस्तू तयार केल्या. ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान अमेरिकेतील शिक्षकांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्यात आले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी श्लोकांच्या माध्यमातून गुरुवंदना केली.