कमलेश वानखेडे ■ नागपूरलोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपच्या विरोधात रिंगणात उतरलेले काही अपक्ष उमेदवार निवडणुकीनंतर मात्र या दोन्ही पक्षाच्या मदतीला धावले आहेत. मतमोजणीकरिता नंबर लावण्यासाठी काँग्रेस व भाजप कार्यकर्ते उत्सुक आहेत. मात्र, एका उमेदवारावर किती प्रतिनिधींना प्रवेश द्यायचा, याच्या र्मयादा आहेत. यावर दोन्ही पक्षांनी उपाय शोधला असून अपक्ष उमेदवारांना गळ घालत त्यांचे प्रतिनिधी बनून आपल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश निश्चित केला आहे.१६ मे रोजी कळमना मार्केट यार्ड येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागली आहे. विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. नागपूर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे येथे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होईल. नियमानुसार एका टेबलवर एक या प्रमाणे उमेदवाराच्या प्रतिनिधीला प्रवेश दिला जातो. त्यासाठी विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवाराच्या सहीनिशी अर्ज सादर करावा लागतो. सादर केलेल्या अर्जात नाव असलेल्या व्यक्तीची पोलीस पडताळणी होते.नियमाचा विचार केला तर भाजपकडून ८४ व काँग्रेसकडूनही ८४ प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळेल. मतमोजणी केंद्रात आपला नंबर लागला नाही म्हणून नाराज होणार्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या दोन्ही पक्षात आहे. दोन्ही पक्षांनी सुरुवातीला यादी तयार केली होती. मात्र नंतर एका एकाची डिमांड वाढत गेली व यादी ४00 वर पोहचली. शेवटी एवढय़ा कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी काँग्रेस व भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारांना गळ घातली. काहींनी तर अपक्ष उमेदवारांचे घर गाठले. त्यांच्या अर्जावर प्रतिनिधी म्हणून आपली नावे टाकली व प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४५0 हून अधिक कार्यकर्ते मतमोजणी केंद्रात दिसतील.
काँग्रेस-भाजपच्या मदतीला अपक्ष उमेदवार
By admin | Updated: May 9, 2014 02:13 IST