सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत. त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत.एक नवं झाड दुसऱ्या अनुभवी वृक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतं. अनेक उन्हाळे-पावसाळे बघितलेल्या वृक्षाच्या ते लक्षातच आलं नाही, म्हणून ते शांतच! तोच वाऱ्याची झुळूक आली. त्याची पानं हलली. मॉरिस कॉलेजच्या टी-पॉर्इंटजवळ एक सत्तरी गाठलेला वृद्ध सायकलवर तिरंगा विकताना दिसला. तोच त्या सिनिअर वृक्षाला एकदम ‘क्लिक’ झालं. एवढ्या वर्षांत कुणीच कशा आपल्याला शुभेच्छा दिल्या नाहीत, साधी आठवणही काढली नाही... त्याला आश्चर्यच वाटलं. ७१ वर्षांपूर्वींचा जन्माचा काळ आठवला. ‘इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय’च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या... १५ आॅगस्ट १९४७! स्वातंत्र्यदिन! पानांची सळसळ अधिकच वाढली.वृक्ष सांगू लागला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. १५ आॅगस्ट १९४७ रोजी या परिसरात वृक्षारोपण करण्याचं ठरलं. तोरण-पताकांनी हा परिसर सजला. सत्तेचं प्रतीक असलेल्या इंग्रज रेसिडेन्सी इमारतीसमोरच वृक्षारोपण करण्यात येणार होतं. त्यावेळी मॉरिस कॉलेजचे संचालक सिन्हा नावाचे गृहस्थ होते. त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. वृक्षारोपण ‘प्रधानमंत्री’ पंडित रविशंकर शुक्ला (त्यावेळी मुख्यमंत्र्यांना ‘प्रधानमंत्री’ म्हटले जात) यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम सुरू झाला. एक एक रोपटं लावलं जात होतं. त्यात माझाही समावेश होता.त्या रेसिडेन्सी इमारतीसमोर आम्ही सर्वच होतो. ‘भारत माता की जय’, ‘महात्मा गांधी की जय’ असा जयघोष सुरू होता. स्वातंत्र्यदिनाच्या त्या पहिल्या कार्यक्रमाचे आम्ही साक्षीदार होतो. त्या काळी हा भाग वर्दळीचा होता. इमारतीसमोरील उद्यान विविध फुलांच्या ताटव्यांनी भरलेलं असायचं. कारंजी थुईथुई करीत असायची. टी-पॉर्इंट परिसर प्रशस्त होता. रांगेत झाडे लावण्यात आली होती. काही झाडे उद्यानातही लावण्यात आली. आज सर्वच बदललेले. रस्ता रुंदीकरणात काही झाडे तोडली गेली. काल-परवा मेट्रो रेल्वेच्या कामात झाडे तोडली. अनेक वर्षांपासून हा भाग सुनसान आहे. या शांततेत माझं ‘मीपण’ हरवल्यासारखं झालं आहे. आज या नव्या मित्रानं-एका नव्या झाडानं वाढदिवसाची आठवण करून दिली. म्हणून आठवणी ताज्या झाल्या. मित्रा, तुलाही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
Independence Day 2018; स्वातंत्र्यदिनी जन्मलेले झाड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 11:04 IST
शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत.
Independence Day 2018; स्वातंत्र्यदिनी जन्मलेले झाड...
ठळक मुद्देअन् इतिहास उलगडला तो हिरवा जोश अद्यापही कायम