नागपूर : कोरोनावरील उपचारात रेमडेसिविर इंजेक्शनसह विविध स्टिरॉईडसारखी औषधी दिली जात असल्याने कोरोनानंतर त्याचे साईड इफेक्ट दिसून येत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: अधिक काळासाठी ‘स्टेरॉईड’चे जास्त डोस घेणाऱ्यांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ आजाराचे प्रमाण वाढले आहे. याचे वेळीच निदान न झाल्यास अंधत्व व मृत्यूचा धोकाही वाढला आहे. रेमडेसिविरमुळे यकृत व मूत्रपिंडाचे आजार व मधुमेह होण्याची शक्यता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कोविड-१९ उपचाराच्या पश्च्यात रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता ढासळते. जीव वाचविण्यासाठी अपरिहार्य ‘स्टेरॉईड’ औषधे देखील दिली जातात. परंतु या औषधी बुरशी वाढण्यास कारणीभूत ठरतात. नाकाच्या अवतीभवती असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्येही ‘म्यूकरमायकोसिस’ या बुरशीची वाढ होते. ही बुरशी कालांतराने दात, हिरड्या, डोळे व मेंदूपर्यंत पसरत जाते. जेथे-जेथे ही बुरशी पसरते, तो भाग सडायला लागतो. सडलेला भाग काढावाच लागतो. एकदा का बुरशीची वाढ मेंदूत होऊ लागली, की रुग्णाची स्थिती गंभीर होऊन मृत्यूचा धोका वाढतो. ‘स्टेरॉईड’मुळे शरीरात लपलेला मधुमेह उफाळून येतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ‘रेमडेसिविर’सारखी अॅण्टिव्हायरल औषधी दिली जातात. या इंजेक्शनचा हृदयाच्या स्पंदनावर परिणाम होतो. मूत्रपिंड व यकृताचा गंभीर आजार असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन धोकादायक ठरू शकते.
- मेयो, मेडिकलमध्ये सुमारे २० हजारांवर रुग्णांना दिले रेमडेसिविर
मेयो, मेडिकलमध्ये दाखल होणारे कोरोनाचे बहुसंख्य रुग्ण गंभीर असतात. कोरोनावर दुसरी ‘अॅण्टिव्हायरल’ औषधी नसल्याने अनेकांना रेमडेसिविर दिले जाते. मेयोमधून आतापर्यंत १० हजार ३०० रुग्ण बरे झाले असून २ हजार ८०१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तसेच मेडिकलमधून ९ हजार ७९७ रुग्ण बरे झाले असून ३ हजार ७१२ रुग्णांचे बळी गेले आहेत. ही दोन्ही रुग्णालये मिळून सुमारे २० हजारांवर रुग्णांना रेमडेसिविर देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु हे इंजेक्शन देताना रक्ताची चाचणी करूनच यकृत व मूत्रपिंडाचे कार्य पाहूनच दिले जात असल्याने त्याचे साईड इफेक्ट फार कमी रुग्णांमध्ये दिसून आल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- रेमडेसिविरमुळे हृदयाची गती कमी-जास्त
रेमडेसिविर देताना त्याच्या दिशानिर्देशाचे पालन केले जाते. यामुळे मेडिकलमध्ये हे इंजेक्शन दिल्याने फार कमी रुग्णांमध्ये त्याचे साईड इफेक्ट दिसून आले. परंतु काही रुग्णांमध्ये हृदयाची गती कमी-जास्त व ठोके तालबद्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. अनियंत्रित मधुमेह व स्टेरॉईड औषधांमुळे ‘म्यूकरमायकोसिस’या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण वाढताना दिसून येऊ लागले आहेत. सध्या मेडिकलमध्ये या आजाराचे १० रुग्ण आहेत. यामुळे कोविडनंतर दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख, मेडिसीन विभाग, मेडिकल
- म्यूकरमायकोसिस रोगाच्या ३५ टक्के रुग्णांना अंधत्व
म्यूकरमायकोसिसमुळे व रक्त गोठल्याने डोळ्यांच्या आत स्ट्रोक होतो. त्यामुळे डोळ्यांना कायमचे अंधत्व येऊ शकते. म्यूकरमायकोसिस रोगाच्या साधारण ३० ते ३५ टक्के रुग्णांना अंधत्व येते. मात्र, रुग्णांनी वेळेत लक्षणे ओळखली व योग्यवेळी उपचारास सुरुवात केली, तर डोळा वाचवता येऊ शकतो.
- डॉ. अशोक मदान, नेत्ररोगतज्ज्ञ, मेडिकल