नागपूर : कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे प्रकार दिसून आले आहेत. यामुळे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येण्याचा धोका १५ ते २० टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ शाखेचे नवे अध्यक्ष डॉ. सतीश पोशट्टीवार यांनी दिली.
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ शाखेची नवी कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. पोशट्टीवार, तर सचिवपदी डॉ. पराग आदमने यांची निवड करण्यात आली. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग मृत्यूचे मुख्य कारण
डॉ. आदमने म्हणाले, भारतात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग मृत्यूचे मुख्य कारण ठरत आहेत. ८० टक्क्यांहून अधिक मृत्यूचे कारण हे रक्तवाहिन्यांतील अडथळ्यांमुळे होत असल्याचे सामोर आले आहे. जागतिक सर्वेक्षणानुसार भारतात ‘कार्डिओव्हस्क्युलर डिसीज’मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १० लाख लोकांमागे २७२ आहे.
वयाची सत्तरी गाठण्यापूर्वी ५२ टक्के मृत्यू
सोसायटीचे २०२२-२३चे निर्वाचित अध्यक्ष डॉ. अनिल जवाहिरानी म्हणाले, पाश्चिमात्य लोकांमध्ये हृदयरोग व रक्ताभिसरण विकारामुळे २३ टक्के मृत्यू वयाची सत्तरी होण्यापूर्वी होतात; तर भारतात ही संख्या ५२ टक्के आहे. कोरोनाचा हृदयावरील परिणामाची माहिती, लवकरच कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया सादर करील, असेही ते म्हणाले.
अशी आहे नवी कार्यकारिणी
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ शाखेच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ. सतीश पोशट्टीवार, सचिव डॉ. पराग आदमाने, निर्वाचित अध्यक्ष डॉ. अनिल जवाहिरानी, माजी अध्यक्ष डॉ. अमोल मेश्राम, माजी सचिव डॉ. पुष्कराज गडकरी, उपाध्यक्ष डॉ. विपुल सेता व डॉ. पंकज हरकुट, सहसचिव डॉ. अमर आमले व डॉ. मनीष जुनेजा, कोषाध्यक्ष डॉ. मोहन देशपांडे यांच्यासह सदस्यांचा समावेश आहे.