सुमेध वाघमारे
नागपूर : नैसर्गिक गर्भपातासाठी प्रदूषण, तणाव, अयोग्य जीवनशैली, इन्फेक्शन आदी कारणे महत्त्वाची मानली जात असताना कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांमध्ये गर्भपाताचा घटना वाढल्याचे दिसून येत आहे. मागील दीड वर्षात मेयो व मेडिकलमध्ये गर्भपाताच्या ५४५ प्रकरणांची नोंद झाली. यातील सुमारे १५ टक्के प्रकरणे नैसर्गिक गर्भपाताची असून जवळपास १० टक्के प्रकरणांमध्ये कोरोना कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. याचा अधिक अभ्यास होणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
गर्भपात होणे आणि गर्भपात करणे या दोन्ही बाबी भिन्न आहेत. नैसर्गिकरीत्या होणाऱ्या गर्भपाताला वैद्यकीय भाषेत ‘मिसकॅरेज’ असे तर कृत्रिमरीत्या होणाऱ्या गर्भपाताला ‘इंड्यूस अबॉर्शन’ असे म्हणतात. २२ व्या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी जर गर्भ गर्भाशयाच्या बाहेर पडला तर तो गर्भपात समजला जातो. तसेच २२ व्या आठवड्यानंतर व ३७ आठवड्याच्या समाप्तीपूर्वी जर गर्भ बाहेर पडला तर त्यास गर्भपात न म्हणता काळपूर्व प्रसूती असे म्हटले जाते.
-गर्भपाताची कारणे
जनुकीय यंत्रणेतील बिघाड, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, संप्रेरकांचे असंतुलन, जंतूसंसर्ग, गर्भाशयातील विकृती, आहारात योग्य अन्न घटकांचा अभाव, खूप शारीरिक कष्ट, मानसिक ताण, मद्यपान, तंबाखूचे सेवन आदींमुळे ‘नैसर्गिक गर्भपात’ होऊ शकतो. मेडिकलच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष झरारीया यांच्यानुसार, गंभीर कोरोना झालेल्या गर्भवती महिलांमध्ये नैसर्गिक गर्भपाताचे प्रकरण दिसून आली आहेत.
मेयोमध्ये १७३ तर मेडिकलमध्ये ३७२ गर्भपात
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) २०२० ते जून २०२१ या दीड वर्षाचा कालावधीत १७३ तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३७२ असे एकूण ५४५ गर्भपाताची प्रकरणांची नोंद झाली. दोन्ही रुग्णालयात नैसर्गिक गर्भपातीची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु यातील १० टक्के गर्भपाताची प्रकरणे कोरोनाशी संबंधित असल्याचे पुढे आले आहे.
-कोरोनामुळे गर्भपात, तज्ज्ञामध्ये मतभिन्नता
कोरोनामुळे गर्भपात होऊ शकतो का, यावर स्त्रीरोग तज्ज्ञामध्ये मतभिन्नता आहे. यामुळे याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. मेडिकलमध्ये नैसर्गिक गर्भपाताची संख्या खूप जास्त नाही. परंतु ज्या गर्भवतीला कोरोनाची गंभीर लक्षणे होती त्यांच्यामध्ये नैसर्गिक गर्भपात झाल्याचे दिसून आले आहे.
-डॉ. आशिष झरारीया, सहयोगी प्राध्यापक प्रसूती व स्त्रीरोग विभाग
मेडिकलमधील गर्भपाताची प्रकरणे
२०२० : २२८
२०२१ : १४४
(३०जून पर्यंत)
मेयोमधील गर्भपाताची प्रकरणे
२०२० : ११५
२०२१ : ५८
(२१ जूनपर्यंत)