रेल्वेगाड्या ‘लेट’ : लोकोपायलटला सिग्नल दिसण्यात अडसरनागपूर : दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. दरम्यान गुरुवारी आठ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली.हिवाळ्यात दाट धुके पडत असल्यामुळे रेल्वेगाड्यांच्या लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसत नाही. सिग्नल दिसत नसल्यामुळे अशा परिस्थितीत रेल्वेगाड्या चालविल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने धुके असलेल्या काळात रेल्वेगाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गुरुवारी आठ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या. उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ८.३० तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ५.२० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ४ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस १० तास, १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ३.३० तास, १२२९६ पटना-बेंगळुरु ६ तास, १२६७० छापरा-चेन्नई गंगाकावेरी एक्स्प्रेस ४ तास आणि १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना ताटकळत रेल्वेगाड्यांची वाट पाहत बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुममध्येही प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)
धुक्यामुळे रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय
By admin | Updated: January 9, 2015 00:46 IST