वर्धा, चंद्रपूर येथे कारवाई : बिल्डर्स लॉबी हादरलीनागपूर : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील आठ आणि चंद्रपुरातील एका फर्मवर गुरुवारी सकाळी एकाच वेळी धाडी घातल्या. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती. ही कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आल्यामुळे नेमकी माहिती उघड होऊ शकली नाही. या धाडींमुळे वर्धा आणि चंद्रपुरातील बिल्डर्स लॉबी चांगलीच हादरली आहे. वर्धेतील कृष्णगिरी लॅन्ड डेव्हलपर्स, कृष्णगिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्राय. लिमि., राधेसिटी डेव्हलपर्स, राधेकृष्ण सिटी डेव्हलपर्स, क्रिष्णानगरी डेव्हलपर्स , शिवनगरी लॅन्ड डेव्हलपर्स, वैष्णवी डेव्हलपर्स आणि हिंगणघाट येथील जगदीश मिहानी यांच्या अशोका इंडस्ट्रिजवर या धाडी घालण्यात आल्या. डेव्हलपर्स आणि इंडस्ट्रिज मालकांच्या प्रतिष्ठानांवर आणि निवासस्थानांवर या धाडी घालण्यात आल्या. ही माहिती आयकर विभागाच्या सूत्राने दिली. मात्र नेमकी कोणती कारवाई झाली, कारवाईत काय आढळले, ही माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कृष्णगिरीचे महेश गुल्हाणे यांच्या बँक खात्याचीही चौकशी करण्यात आली. चंद्रपूर येथील धवल कन्स्ट्रक्शन कंपनीवर आयकर अधिकाऱ्यांनी धाड टाकली. सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. आयकर विभागाच्या धाडी पडल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. कारवाई बंदद्वार असल्यामुळे नेमके काय होत आहे. याची माहिती कुणालाही मिळू शकली नाही. या कारवाईत मोठे घबाड आयकर विभागाच्या हाती लागल्याची चर्चा मात्र ऐकू येत होती. महिला आयकर अधिकाऱ्यांनीही हिंगणघाट आजंती शिवारातील स्वाद चहा कंपनीवर धाड घातल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
‘लँड डेव्हलपर्ससह नऊ ठिकाणी आयकर धाडी
By admin | Updated: February 6, 2015 00:54 IST