जंगल सफारी : मुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी लुटला आनंदनागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राणी बचाव केंद्राचे (रेस्क्यू सेंटर) गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. सुधाकर देशमुख, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, वन विभागाचे सचिव विकास खारगे, वन विकास महामहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी व सहसचिव पी. के. महाजन उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी गोरेवाडा जंगल सफारीचासुद्धा शुभारंभ करू न, जंगल सफारीचा आनंद लुटला. यासोबतच गोरेवाडा जंगल सामान्य नागरिकांसाठी जंगल सफारीकरिता खुले करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी येथील वन्यप्राणी बचाव केंद्रात (रेस्क्यू सेंटर) ठेवण्यात आलेल्या सहा बिबट्यांची पाहणी केली. येथे सुमारे २५ हेक्टर जागेवर सुसज्जित रेस्क्यू सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात वाघ, बिबट, अस्वल, कोल्हे, हरीण, विषारी व बिनविषारी साप व पक्षी यांच्यासाठी मोठ-मोठे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. वन विभागाच्या विविध ठिकाणी बंदिस्त असलेल्या वन्यप्राण्यांना येथील रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवाय जखमी वन्यप्राण्यांवर उपचारसुद्धा केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
वन्यप्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन
By admin | Updated: December 18, 2015 03:38 IST