लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव टेक शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात वाहन चालकास अटक करण्यात आली असून, वाहनातील सहा जनावरांची सुटका करीत एकूण ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १५) मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सचिन धनराज हिंगे (२५, रा. हनुमान नगर, येरलीपुरा, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. देवलापार (ता. रामटेक) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मध्य प्रदेशातून देवलापार मार्गे नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील मानेगाव टेक शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी एमएच-३०/एबी-४२३६ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली. त्या वाहनात सहा जनावरे काेंबली असल्याचे आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली.
ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालकास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे वाहन आणि ५५ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली असून, वाहनातील जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, पाेलीस नाईक मिथिलेश पांडे, प्रमाेद मडावी, गजानन जाधव यांच्या पथकाने केली.