३0 हजारावर लोकांनी तोडले सिग्नल : दीड कोटीवर वसुली नागपूर : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. कारचालकाने वाहतूक सिग्नल तोडल्याने या अपघातात एका केंद्रीय मंत्र्याला आपला जीव गमवावा लागला. देशाच्या राजधानीत घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक नियमांबाबत देशभरात पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतुकीचे नियम आणखी कडक करीत तिसर्यांदा नियम तोडणार्यांचा परवाना रद्द करण्याची घोषणा केली आहे. वाहतुकीचे अनेक नियम आहेत. परंतु याचे पालन खरच केले जाते का? हा प्रश्न आहे. वाहतुकीचे नियम तोडण्यामध्ये आम्ही नागपूरकरही मागे नाहीत. गेल्या वर्षभरात तब्बल ३0 हजारावर वाहन चालकांनी वाहतूक सिग्नल तोडल्याची अधिकृत माहिती पुढे आली आहे. चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाही तर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. १ जानेवारी २0१३ ते ३१ मार्च २0१४ पर्यंत ३0 हजार १२३ जणांनी सिग्नल तोडले. वाहतूक शाखेच्या सहा झोनमधून दक्षिण झोनमध्ये सर्वात जास्त ही प्रकरणे दाखल करण्यात आली तर ‘ड्रंक अँण्ड डाईव्ह’मध्ये मागील १५ महिन्यात १८ हजार २७३ तळीरामांना चाप बसला. यांच्याकडून तब्बल १ कोटी ६३ लाख ९२ हजार ९00 रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणार्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. सीसीटीव्ही लावण्याची गरज उपराजधानीत लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या वाढत आहे. प्रत्येक वाहनधारकांवर लक्ष ठेवणे कठीण आहे. यामुळे चौका-चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्यावर वाहतूक नियंत्रण करणे आवश्यक झाले आहे. या संदर्भात काही सामाजिक संघटनांकडून वाहतूक विभागाकडे मागणीही करण्यात आली आहे, परंतु विभागाने निधीची अडचण समोर केली आहे. यावर आणखी एक उपाय म्हणजे वाहतूक पोलिसांनी चौकात रस्त्याच्या कडेला उभे न राहता चौकात उभे रहावे. यामुळे सिग्नल तोडणार्यांची संख्या कमी होईल. विशेष म्हणजे, सिग्नल तोडणार्यांकडून चिरीमिरी घेण्याचे प्रकार वाढल्याने वाहनधारकांची हिंमत वाढली आहे.
सिग्नल तोडाल तर.
By admin | Updated: June 7, 2014 02:16 IST