थेट घरपोच ‘ई-चालान’ : नागपूरकरांना शिस्त लागणार, गुन्हेदेखील घटणार नागपूर : एखाद्या चौकात वाहतूक पोलीस नसतील तर लाल सिग्नल तोडणारे, ‘झेब्रा क्रॉसिंग’वर गाडी उभे करणारे किंवा फुशारकी मारत विना हेल्मेट गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र अशा महाभागांची आता खैर नाही. ‘स्मार्ट सिटी’कडे पाऊल टाकत असलेल्या नागपुरात आता वाहतुकीचे नियम तोडणारे तंत्रज्ञानाच्या मदतीने कायद्याच्या सापळ्यात सापडणार आहेत. आॅरेंज सिटी चौक ते थेट जपानी गार्डन चौकापर्यंत विविध ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून वाहतूक पोलिसांची सिग्नलवरील घडामोडींवर बारीक नजर राहणार आहे. नियम तोडणाऱ्यांच्या घरी थेट ‘ई-चालान’ पोहोचविण्यात येईल. वेळोवेळी समोर आलेल्या आकडेवारीनुसार शहरात वाहतूकदारांना शिस्त नाही, असे स्पष्ट झाले आहे. अनेकदा तर वाहतूक पोलीस असतानादेखील सर्रास नियम तोडले जातात. कुणी मोठ्या वाहनांचा आडोसा घेऊन ‘ट्रिपल सीट’ निघून जातो, तर बरेच जण गर्दीचा फायदा घेऊन सिग्नल तोडून पसार होतात. या सर्व बाबी लक्षात घेता पोलीस यंत्रणा ‘हायटेक’ करण्याची सुरुवात झाली. हेल्मेट न घालणाऱ्यांचे फोटो काढून ‘ई-चालान’ पाठविण्यात येत होते. आता त्याहून एक पाऊल पुढे जात थेट ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातूनच नियम तोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. जर कुणी वाहतुकीचा नियम तोडला तर त्या व्यक्तीचे वाहन ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद होईल व काही वेळातच ‘ई चालान’ जारी करण्यात येईल. ‘ई चालान’ मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत दंड जमा करणे अपेक्षित आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना न्यायालयामार्फत समन्स पाठविण्यात येणार आहे व पुढे त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. ‘फॅन्सी नंबर प्लेट’वरदेखील राहणार लक्ष आता आॅरेंज सिटी चौक ते जपानी गार्डन या मार्गावर ‘सीसीटीव्ही’ लागले असून या माध्यमातून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू झाले आहे. केवळ सिग्नलच नव्हे तर रस्ता दुभाजकांवरील खांबांवरदेखील ‘कॅमेरे’ लागले आहेत. लवकरच शहरातील सर्व ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ लावण्यात येणार आहे. या ‘सीसीटीव्ही’चे ‘कमांड कंट्रोल सेंटर’ तयार करण्यात येत आहे. येथून लगेच नियम तोडणाऱ्यांच्या नावाने ‘ई-चालान’ तयार होईल. सिग्नल तोडणे, विना हेल्मेट गाडी चालवणे यांच्यासोबतच ‘फॅन्सी नंबर प्लेट’, ‘रॅश ड्रायव्हिंग’ इत्यादींवर आमचे लक्ष राहील. कुणीही कायद्यापासून पळू शकणार नाही, असे वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी स्पष्ट केले.
सिग्नल तोडाल तर सीसीटीव्हीत दिसाल !
By admin | Updated: January 5, 2017 01:59 IST