भाजपची ताठर भूमिका : शिवसेनेशी सरसकट युती नाही कमलेश वानखेडे नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात वाढलेल्या ताकदीचा हवाला देत शिवसेनेला ताणून धरण्याची रणनीती आखली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी संपूर्ण जिल्ह्यात सरसकट युती करायची नाही. तर जिल्हा परिषद सर्कलनिहाय शक्य असेल तेथेच युती करायची व उर्वरित जागांवर शिवसेनेशी दोन हात करायचे, असा कार्यक्रम भाजपने आखला आहे. भाजपच्या अशा ताठर भूमिकेपुढे झुकायचे नाही, तर ताकदीने लढायचे अशी डरकाळी शिवसेनेनेही फोडली आहे. सद्यस्थितीत जि.प.चे ५८ सर्कल आहेत. पारशिवनी नगर पंचायत व वानाडोंगरी नगर परिषदेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. सध्या भाजपचे २२ तर शिवसेनेचे ८ सदस्य आहेत. २०१२ मध्ये निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपने शिवसेनेला बाजूला सारत राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. भाजपने स्वत:कडे अध्यक्षपद ठेवत राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद दिले होते. अडीच वर्षानंतर राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी सत्तेबाहेर पडली. तेव्हा गरज म्हणून भाजपने शिवसेनेला जवळ केले व उपाध्यक्षपद दिले. आता भाजपला एकहाती सत्ता हवी आहे. हे डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेशी युती करण्याबाबत ‘मास्टर प्लान’ भाजपने तयार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आकड्यांवर युती करायची नाही. तर सर्कलनिहाय बोलणी करायची. जेथे भाजपकडे सक्षम उमेदवार आहेत, त्या जागा काही केल्या सोडायच्या नाहीत. शिवसेना दावा करेल त्या जागांवर भाजपकडे सक्षम उमेदवार नसतील तरच ती जागा सोडायची, असे भाजपचे ठरले आहे. पंचायत समितीच्या बाबतीतही अशीच भूमिका घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेची जागा भाजपला मिळाली म्हणजे पंचायत समितीची जागा शिवसेनेसाठी सोडली जाईलच, असे नाही. तेथेही आधी पक्षाच्या सक्षम उमेदवारासाठीच आग्रह धरला जाणार आहे. जिल्ह्यात ८ जानेवारीला होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतही सर्वच ठिकाणी युती झालेली नाही. मोहपा नगर परिषदेत युती आहे तर कळमेश्वरमध्ये नाही. भाजपच्या या फॉर्म्युल्यानुसार युती झाली तर काही सर्कलमध्ये युतीचा एकच उमेदवार दिसेल तर काही सर्कलमध्ये भाजप व शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरुद्ध रिंगणात असल्याचे चित्र पहायला मिळेल. दुसरीकडे शिवसेनाही नमते घेण्यास तयार नाही. २००७ मध्ये भाजप-शिवसेना युती होती. तेव्हा शिवसेनेला ४ जागा मिळाल्या. २०१२ मध्ये युती नव्हती, तर शिवसेनेच्या जागा वाढून ८ झाल्या. युती न केल्याचा फायदा शिवसेनेलाच झाला. सद्यस्थितीत मौदा, नरखेड, रामटेक, पारशिवनी या चार पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती आहे. रामटेक, मौदा, पारशिवनी या तीन तालुक्यात शिनसेनेला पर्यायच नाही. त्यामुळे युती करणे आमची गरज नाही. स्वबळावर लढलो तर आठच्या सोळा जागा होतील, असे टोकाचे बोल शिवसेना नेते बोलत आहेत. तसे पक्षप्रमुखांनाही कळविले आहे. भाजपला हात जोडणार नाही भाजपला हात जोडून, नमते घेऊन युती करणार नाही. भाजपकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आला तरच युती करू. आम्ही प्रस्ताव घेऊन भाजपकडे जाणार नाही. कारण मागील अनुभव वाईट आहेत. पडणाऱ्या जागा शिवसेनेला घेण्याचा आग्रह धरतात व शेवटी जुळत नाही, असे सांगून वेगळा मार्ग धरतात. या वेळी शिवसेना गाफिल नाही. स्वबळावर लढण्यासाठी सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत. - खा. कृपाल तुमाने, शिवसेना नेते
युतीचा विचार, पण जि.प.सर्कलनिहाय
By admin | Updated: December 23, 2016 01:29 IST