नागपूर : कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे मेडिकलमधील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील ९९ खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) फुल्ल झाले आहे. परिणामी, आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्यासाठी बंद ठेवण्यात आलेल्या नव्या १२० खाटांमधील ४० खाटांच्या एका आयसीयू कक्षाला तोंडी मंजुरी देऊन शनिवारपासून रुग्णसेवेत सुरू केले. एकीकडे अपुरी यंत्रणा, दुसरीकडे वाढत्या रुग्णसेवेचा भार सांभाळावे लागत असल्याने मेडिकल प्रशासन अडचणीत आले आहे.
कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील सतरा दिवसांपासून हजारावर जाणारी रुग्णसंख्या आता दोन हजारांवर गेली आहे. दरम्यानच्या काळात प्रशासनाने रुग्ण खाटांची सोय केली नाही. यामुळे चिंतेचे वातावरण आणखी गडद झाले आहे. कोरोनाबाधितांसाठी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये (ट्रॉमा केअर सेंटर) तीन आयसीयू आहेत. यातील दोन आयसीयूची क्षमता प्रत्येकी २५ खाटांची तर एका आयसीयूची क्षमता २४ खाटांची आहे. उपलब्ध माहितीनुसार शुक्रवारी तिन्ही आयसीयू फुल्ल झाले. ३०-३० खाटांचे असलेले ‘एचडीयू’ही फुल्ल होण्याच्या मार्गावर होते. मेडिकलच्या मुख्य इमारतीला लागून तीन मजल्याची १२० खाटांची नवीन आयसीयूची इमारत आहे. व्हेंटिलेटरपासून ते अद्ययावत यंत्रसामग्रीने ही इमारत सज्ज आहे. पूर्वी येथे कोरोनाचा गंभीर रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु जानेवारी महिन्यात भंडारा जिल्हा रुग्णालयात दहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यूचा घटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व रुग्णालयांना फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे केले. नव्या आयसीयू इमारतीचे फायर ऑडिट झाले नसल्याने रातोरात येथील रुग्ण पुन्हा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याला कुलूप ठोकण्यात आले. दरम्यानच्या काळात बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने इमारतीचे फायर ऑडिट केले. त्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणेसाठी लागणारा खर्चाचा तपशील तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. परंतु निधी न मिळाल्याने आयसीयू कुलूपात होते. कोविड हॉस्पिटलचे आयसीयू फुल्ल झाल्याने गंभीर रुग्णांना ठेवावे कुठे?, हा प्रश्न निर्माण झाला. मेडिकल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही बाब मांडली. त्यांनी आयसीयूच्या १२० खाटांमधून ४० खाटांचा एक कक्ष सुरू करण्यास तोंडी मंजुरी दिल्याचे समजते. यामुळे शनिवारपासून वॉर्ड ५० सुरू करण्यात आला. परंतु आणखी रुग्ण वाढल्यास नंतर काय, याचे उत्तर कोणाकडेच नाही. महत्त्वाचे म्हणजे, कोविड हॉस्पिटल व नव्या आयसीयूच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा नाही. आगीची घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्नही आहे.
-मेडिकलमधील कोविडचे दोन वॉर्डही फुल्ल
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमधील १३५ खाट जवळपास फुल्ल झाल्या आहेत. मेडिकलच्या मुख्य इमारतीतील २८ खाटांचे वॉर्ड क्र.१२, २६ खाटांचे वॉर्ड क्र. १३ व १८ खाटांचे पेइंग वॉर्ड कोविड रुग्णांसाठी आहे. शनिवारी येथीलही खाटा भरल्याने वॉर्ड क्र. १ रुग्णसेवेत सुरू करण्यात आला. रुग्ण वाढताच आणखी काही वॉर्ड सुरू केले जाण्याची शक्यता आहे.