लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : भरधाव कारने माेटरसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुड-काटाेल-नागपूर मार्गावरील भारसिंगी (ता. नरखेड) परिसरात नुकतीच घडली.
शेख रहेमान शेख रमजान (४८, रा. वरूड, जिल्हा अमरावती) असे मृताचे नाव असून, शबनम शेख रहेमान (३५) व शेख साेहेल शेख रहेमान (१०) दाेघेही रा. वरूड, जिल्हा अमरावती अशी जखमींची नावे आहेत. शबनम यांच्या डाेळ्यांना त्रास असल्याने शेेख रहेमान त्यांना व मुलाला घेऊन एमएच-२७/सीएस-३१८४ क्रमांकाच्या माेटरसायकलने वरुडहून नागपूरला जात हाेते. त्यांनी भारसिंगी बसस्टाॅप ओलांडताच मागून वेगात आलेल्या एमएच-३१/सीपी-८६१५ क्रमांकाच्या कारने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही जखमींना लगेच काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंती तिघांनाही हिंगणा येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे शेख रहेमान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार जाेशी करीत आहेत.