हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : पत्नीवर केले होते खोटे आरोपराकेश घानोडे नागपूर ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशी एक म्हण आहे. नागपूर येथील एका पतीने अशाचप्रकारे वागून कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध खोटे आरोप सिद्ध केले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीस दिलासा देऊन पतीला स्वत:च्याच क्रूरतेसाठी घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह याचिका दाखल केली होती. त्याने लेखी बयानामध्ये पत्नीवर विविध खोटे आरोप केले होते. २१ नोव्हेंबर २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देऊन क्रूरतेच्या आधारावर घटस्फ ोट मंजूर केला होता. याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी पत्नीचे अपील मंजूर करून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचे पुरावे विचारात घेताना चूक केली आहे. पत्नीला लेखी बयानामध्ये स्वत:ची बाजू योग्य पद्धतीने मांडता आली नाही म्हणून पतीचा दावा सिद्ध होत नाही. आपसात तडजोड करताना पत्नीकडून तिच्या वागणुकीसंदर्भात चिठ्ठी लिहून घेण्यात आली होती. दबावाशिवाय कोणतीही पत्नी अशाप्रकारची चिठ्ठी लिहून देऊ शकत नाही. पतीचे वडील पोलीस निरीक्षक असल्यामुळे स्वत:वरील अत्याचाराची पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे धाडस तिच्यामध्ये नव्हते. पतीला पत्नीची क्रूरता सिद्ध करण्यात अपयश आले असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.असे आहे प्रकरणस्कविता व कालिदास (काल्पनिक नावे) यांचे ७ डिसेंबर २००८ रोजी लग्न झाले. यानंतर कविता काही दिवसांतच वाईट वागायला लागली. मुलगी १० महिने व दीड वर्षांची असताना कविता कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली. कविताला घटस्फोट हवा असल्याचे तिच्या आईने कळविले होते. कविताला मानसिक आजार आहे असे कालिदासचे म्हणणे होते. कविताने हे सर्व आरोप फेटाळले. लग्नानंतर घरची सर्व कामे करीत होती. कालिदासने मारहाण करून दोनदा माहेरी सोडले. माहेरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे कालिदास व त्याचे आई-वडिला नेहमीच टोमणे मारत होते. क्रूरतेने वागत होते. मुलीशी भेटू देत नव्हते. कालिदासने कधीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही अशी बाजू कविताने मांडली होती.
पतीला स्वत:च्या क्रूरतेसाठी घटस्फोट मिळू शकत नाही
By admin | Updated: August 1, 2015 03:57 IST