()
प्रत्येक केंद्रावर १० ते १५ जण राहतात उपाशी : थाळींची संख्या वाढवण्याची मागणी
नागपूर : कुणीही उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रसंचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीला अनुदान व थाळीचे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंतच हे केंद्र सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज किमान १५ ते २० जणांना उपाशीपोटी परत जावे लागत असल्याचे वास्तव आहे.
कोरोनाकाळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. त्यानंतर ५ रुपयात शिवभोजन देण्यात येत होते. आता शिवभोजन निशुल्क दिले जात आहे. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधार आणि रस्त्यावर भटकत असणाऱ्यांना फायदा होत आहे. जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांना ८५०० लोकांना जेवण देण्याचे टार्गेट दिले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे केंद्र आहेत. शासकीय रुग्णालयांच्या समोर, बसस्थानकांजवळील केंद्रावर शिवभोजनासाठी चांगलीच गर्दी असते. गोरगरीब आणि रस्त्यावर भटकणाऱ्यांचा एकावेळेचा प्रश्न शिवभोजन थाळीमुळे सुटला आहे; परंतु केंद्राची वेळ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत असते. प्रत्येक केंद्राची थाळींची संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे अनेकांना परत जावे लागते.
- तुकडोजी चौक
तुकडोजी चौकाजवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर असलेल्या मंथन महिला बचत गटाच्या शिवभोजन केंद्रावर दररोज ४०० ते ५०० लोक येतात. परंतु केंद्राला २२५ थाळींचे टार्गेट दिले आहे. २५ ते ३० थाळ्या ते आपल्याकडून देतात. पण सर्वांनाच ते देऊ शकत नाही. त्यामुळे परत पाठवावे लागते. आमच्या केंद्रावर येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता किमान टार्गेट वाढवून देण्याची गरज संचालिका वर्षा गुजर यांनी व्यक्त केली.
- गणेशपेठ बसस्टॅण्ड
गणेशपेठ बसस्टॅण्ड समोर श्री गणेश भोजनालय यांच्याकडे शिवभोजन थाळी मिळते. बाहेरगावाहून येणारे अनेकजण याचा लाभ घेतात. २ वाजेपर्यंत त्यांच्याकडे शिवभोजन मिळते. २२५ थाळींचे त्यांना टार्गेट आहे. टार्गेटच्यावर भोजन दिल्यास त्यांना अनुदान मिळत नाही. थाळीचे टार्गेट संपले की ते भोजन केंद्र बंद करतात.
- दररोज जिल्ह्यात ८५०० जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?
जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: ८५०० लोक घेत असतात. काही केंद्रावर दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त लोक येतात. टार्गेट संपल्यानंतर केंद्र बंद करावे लागते. काही केंद्रावरून शंभराहून अधिक लोक परत जातात. तर काही केंद्रावर टार्गेट एवढेही लोक येत नाहीत. शासनातर्फे शहरात पुन्हा केंद्र वाढविण्यात येणार आहे. पण केंद्र चालकांचे म्हणणे आहे की केंद्र वाढविण्यापेक्षा टार्गेट वाढवून द्यावे.
-दृष्टिक्षेपात
जिल्ह्यात एकण शिवभोजन केंद्र - २७
रोजच्या थाळीची संख्या - ३५००
शहरात एकूण शिवभोजन केंद्र - २४
रोजच्या थाळीची संख्या - ५०००