नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाख आहे. २७३.७५ किलोमीटर लांबीचे चौरस क्षेत्रफळ आहे. शहरात १२.५० लाख वाहने आहेत. दररोज १ लाख ८० हजार नागरिक विविध वाहनांनी प्रवास करतात. शहरातील रस्त्यांचे जाळे विचारात घेता सर्व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी १ हजार कोटीची गरज आहे. परंतु महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाला यासाठी ५० ते ६० कोटीचीच तरतूद केली जाते. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा सामना करण्याशिवाय तूर्त तरी दुसरा पर्याय दिसत नाही.शहरातील नवीन रस्त्यांची निर्मिती व दुरुस्तीसाठी १ हजार कोटीची गरज आहे. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेता राज्य व केंद्र सरकारच्या मदतीशिवाय रस्ते दुरुस्ती शक्य नसल्याचे चित्र आहे. २०१४-१५ या वर्षाचा मनपाचा अर्थसंकल्प १६०० कोटीचा होता. परंतु एलबीटीमुळे मनपाला अपेक्षित उत्पन्न झाले नाही. या विभागाकडून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत २०० कोटीच्या आसपास उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. गेल्या एक-दोन महिन्यात रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. परंतु यात शहरातील सरसकट सर्व रस्त्यांच्या कामाचा समावेश नाही. वस्त्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. सिमेंट रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून रखडले होते. परंतु आता या कामासाठी सरकारकडून ३०० कोटी मिळणार असल्याने सिमेंट रस्त्यांची कामे होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कसा येईल स्मार्ट लूक
By admin | Updated: May 23, 2015 02:44 IST