अभियानाचा दुसरा टप्पा : मनपा मागणार नागरिकांना सूचनानागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट योजना व त्याची अंमलबजावणी कशी करावी या संदर्भात थेट जनतेशी संवाद साधून त्यांच्या कल्पना व सूचना मनपा जाणून घेणार आहे. यासाठी ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग या अभियानाचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. यात शहराच्या विविध भागातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या स्मार्ट सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे. एखादी समस्या असल्यास तिचा निपटारा करण्यासाठी नागरिकांनाच उपाययोजना सांगावयाच्या आहे. यासाठी अर्जाचा नमुना तयार करण्यात आला आहे. त्यात विविध प्रश्न विचारण्यात आले असून नागरिकांना त्यावर आपला अभिप्राय द्यावयाचा आहे. महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. या टप्प्यात नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या असून त्यांनाच उपाय सुचविण्याचे आवाहन केले आहे. योजनाविषयी नागरिकांना विविध प्रश्न विचारण्यात येतील. यासाठी प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन रोड शो केले जाणार आहे. तसेच शहरातील २० ठिकाणी दर दोन तासांनी रोड शो केले जातील. ७ नोव्हेंबरला सकाळी ६ ते ७.४५ दरम्यान गांधीबाग उद्यान, सकाळी ८ ते ९.३० दरम्यान झेंडा चौक, सकाळी ११ ते २ दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशन समोर नागरिकांना सूचना देता येईल. अभियान सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यात अधिकाधिक लोकांचा सहभाग राहील, अशी माहिती दटके यांनी दिली. सतरंजीपुरा झोनमध्ये ७ नोव्हेंबरला दुपारी ३ ते ४.४५ दरम्यान युनिव्हर्सल चौक, सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान शांतिनगर, ६.३० ते रात्री ८ दरम्यान विटभट्टी चौकात रोड शो चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रोड शो चे आयोजन केले जाणार आहे. उर्वरित दोन दिवसात शहराच्या विविध भागात रोड शो आयोजित केले जाणार आहे.(प्रतिनिधी)
तुम्हीच सांगा स्मार्ट सिटी कशी होईल!
By admin | Updated: November 7, 2015 03:15 IST