काटोल : काटोल तालुक्यातील काही गावांमध्ये सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान तर, नरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये सकाळी १० वाजतानंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मतदारसंघातील बहुतांश शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळी मतदानाचा वेग मंदावला होता. काही ठिकाणी दुपारी १२.३० वाजतानंतर तर काही गावांमध्ये दुपारी ३ नंतर मतदानाला वेग आला. सायंकाळी ४ नंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. काही मतदान केंद्रांवर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मतदारसंघातील दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन ठिकाणी मतदान केंद्रातील वीजपुरवठा खंंडित झाल्याने तसेच सहा मतदान केंद्रांतील इव्हीएममध्ये ऐनवेळी बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळ थांबविण्यात आली होती. नरखेड तालुक्यातील सकाळी १० वाजेपर्यंत मतदानाला वेग येताच पावसाने हजेरी लावली आणि मतदान अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मतदानाचा हक्क बजावण्यात ज्येष्ठ नागरिक व तरुण मतदारांची संख्या लक्षणीय होती. अनेक मतदान केंद्रांवर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना त्यांच्या मतदारयादीतील क्रमांकाच्या चिठ्ठ्या देत असल्याचेही दिसून आले. मतदानाच्या काळात संपूर्ण मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मजुरांमध्ये उत्साहसध्या सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यातच निवडणुका आल्याने ग्रामीण भागातील मजूरवर्ग कामामुळे मतदानापासून वंचित तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात होती. ग्रामीण भागातील बहुतांश मजूरवर्गाने आपला मतदानाचा हक्क बजावून कामाला जाणे पसंत केले. त्यामुळे या मतदारसंंघातील मतदानाची टक्केवारीदेखील यावेळी वाढली. काही गावांमधील मजूर सकाळी ६.३० वाजता शेतात कामाला निघून गेले होते. त्यांनी दुपारी १ वाजतानंतर मतदानाचा हक्क बजावला. दुपारी २ नंतर गृहिणीही घरकाम आटोपून मतदानासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
हाऊसफुल्ल मतदान
By admin | Updated: October 16, 2014 00:56 IST